मोदी शाहांकडून नेहरूंच्या चुकीचा पाढा, संजय राऊतांचा 'पटेल' पलटवार, सरदार असते तर...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sanjay Raut Speech: पहलगाममध्ये झालेला हल्ला आणि त्यानंतर सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर याची माहिती देण्याकरिता संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे. राज्यसभेतील चर्चासत्रात बुधवारी संजय राऊत यांनी सहभाग नोंदवला.
नवी दिल्ली : आत्ताचे सरकार भूतकाळात रमणारे आहे. विषय कुठलाही असो त्यांना पंडित नेहरूंची आठवण येते. पंडित नेहरू हे भाजपच्या नेत्यांना जगूही देत नाही आणि झोपूही देत नाहीत. सरदार पटेल यांचीही भाजपवाल्यांना आठवण येते. मला काँग्रेसला एक सांगायचंय की तुम्ही सरदार पटेल यांना पंतप्रधान न बनवून ऐतिहासिक चूक केली आहे. नेहरू खूपच लोकशाही मानणारे नेते होते. पटेल लोहपुरूष होते. माझ्या माहितीप्रमाणे सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिल्यांदा बंदी आणली. जर सरदार पटेल अजून १० वर्ष जगले असते तर भाजपवाले संसदेत दिसलेही नसते, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला.
पहलगाममध्ये झालेला हल्ला आणि त्यानंतर सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर याची माहिती देण्याकरिता संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे. राज्यसभेतील चर्चासत्रात बुधवारी संजय राऊत यांनी सहभाग नोंदवला. बुधवारी लोकसभेच्या चर्चेत सत्ताधारी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी भारत-पाकिस्तानच्या संघर्षाचे मूळ कारण पंडित नेहरू असल्याचे सांगून त्यांच्यावर खापर फोडण्याचे प्रयत्न केले. हाच धागा पकडून केवळ चार मिनिटांच्या भाषणात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
advertisement
पहलगामच्या हल्ल्याला जबाबदार कोण? नेहरूंचा राजीनामा मागणार की काय?
संजय राऊत म्हणाले, पहलगाममध्ये २६ लोकांची हत्या झाली, कशी ते सरकार अजूनही सांगत नाही. काश्मीरमधील ३७० हटविल्यानंतर राज्याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. तिकडचे पोलीस गृहमंत्रालयाचा आदेश ऐकतात. पूर्ण राज्यात आर्म फोर्स लावण्यात आले आहे. तिकडचे राज्यपालही आपलेच आहेत, अत्यंत मजबूत आहेत. सुरक्षेत चूक झाली हे त्यांनीही मान्य केले आहे परंतु सरकार अजूनही आपली चूक मान्य करीत नाही. २६ आया बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. त्यांची जबाबदारी कोण घेणार, राजीनामा कोण देणार? पंडित नेहरू राजीनामा देणार की ट्रम्प देणार की जेडी व्हान्स राजीनामा देणार आहेत? या हल्ल्याची जबाबदारी घेऊन देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांची नैतिक जबाबदारी आहे.
advertisement
उपराष्ट्रपतींचा राजीनामा २४ तासांत घेतला जातो पण...
भारत देशात २४ तासांत देशाच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो. कारण तुमची गोष्ट ते ऐकत नाहीत. परंतु २६ लोकांची हत्या होऊनही कुणी राजीनामा देत नाही की कुणी माफी मागत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतला देवाचा अवतार मानतात, त्यांचे भक्त कार्यकर्ते देखील त्यांना देवाचा अवतार मानतात. मोदी म्हणतात की मला काळाची आधीच चाहूल लागते ही माझ्यावर असलेली देवाची कृपा आहे, असे मोदी सांगतात. मग पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणार आणि २६ लोकांना मारणार ते मोदींना कसे कळले नाही?
advertisement
तर भाजपवाले आज देशात दिसलेही नसते...!
मी कालपासून सत्ताधारी पक्षातील मोठमोठ्या नेत्यांची भाषणे ऐकतोय. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, एस जयशंकर, जेपी नड्डा यांची मते मी ऐकली. या सगळ्यांना पंडित नेहरू यांची खूपच आठवण येत आहे. हे सगळे नेते भूतकाळात रमणारे आहे. पंडित नेहरू हे या सगळ्या नेत्यांना जगूही देत नाही आणि झोपूही देत नाहीत. सरदार पटेल यांचीही भाजपवाल्यांना आठवण येते. मला काँग्रेसला एक सांगायचंय की तुम्ही सरदार पटेल यांना पंतप्रधान न बनवून ऐतिहासिक चूक केली आहे. नेहरू खूपच लोकशाही मानणारे नेते होते. पटेल लोहपुरूष होते. माझ्या माहितीप्रमाणे सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिल्यांदा बंदी आणली. जर सरदार पटेल अजून १० वर्ष जगले असते तर भाजपवाले संसदेत दिसलेही नसते. संघावर त्यांनी पूर्णपणे बंदी आणली असती. तुम्ही नेहरूंचे आभार मानायला हवेत, त्यांच्यामुळेच तुम्ही आज संसदेत बसू शकला, देशाची सत्ता गाजवताय. हे नेहरूंनी तुमच्यावर केलेले उपकार आहेत. जर सरदार पटेल पंतप्रधान बनले असते तर तुम्ही सत्तेतच नाही तर देशातही दिसले नसते. त्यांनी तुम्हाला पूर्णपणे उखडून टाकले असते, असा जोरदार पलटवार राऊत यांनी केला.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
July 30, 2025 7:27 PM IST
मराठी बातम्या/देश/
मोदी शाहांकडून नेहरूंच्या चुकीचा पाढा, संजय राऊतांचा 'पटेल' पलटवार, सरदार असते तर...


