Cave on Moon: चंद्रावर सापडलं 'घर'! तिथं राहू शकतो माणूस; ती जागा पाहून शास्त्रज्ञही थक्क
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
विशेष म्हणजे ही गुहा 'अपोलो 11' मोहिमेच्या लँडिंग साईटपासून फार दूर नाही. 55 वर्षांपूर्वी अपोलो 11 यानातून नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून शास्त्रज्ञ, चंद्रावर माणसाला वास्तव्य करणं शक्य आहे की नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नासा आणि इस्त्रोसारख्या अंतराळ संशोधन संस्थांनी विविध मोहिमा देखील सुरू केल्या आहेत. या प्रयत्नात आता नासाला मोठं यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांना चंद्राच्या पृष्ठभागावर एका गुहेचं अस्तित्व सापडलं आहे. या ठिकाणी भविष्यात माणूस जिवंत राहू शकतो, अशी आशा आहे. विशेष म्हणजे ही गुहा 'अपोलो 11' मोहिमेच्या लँडिंग साईटपासून फार दूर नाही. 55 वर्षांपूर्वी अपोलो 11 यानातून नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.
नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी ज्या ठिकाणी फेरफटका मारला होता त्या ठिकाणापासून ही गुहा 400 किलोमीटर अंतरावर असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. नासाचं रोबोटिक यान 'लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर'कडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. शास्त्रज्ञांनी चंद्रावर सापडलेल्या गुहेच्या खुणांची तुलना लाव्हाच्या प्रवाहाने पृथ्वीवर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बोगद्याच्या रचनेशी केली आहे. हा रिसर्च 'नेचर ॲस्ट्रॉनॉमी' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ही गुहा किमान 100 मीटर लांबीची असू शकते. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, सध्या फक्त एक गुहा सापडली आहे. पण, चंद्राच्या पृष्ठभागावर अशा शेकडो गुहा असू शकतात.
advertisement
हा शोध माणसाला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे. कारण, यातून स्पष्ट होतं की चंद्राच्या पृष्ठभागावरील गुहा भविष्यात माणसाचा निवारा ठरू शकते. अशा गुहा कठीण वातावरणात चांगला निवारा देऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञांना चंद्रावर दीर्घकाळ राहणं आणि संशोधन करणं सोपं होईल. चंद्रावरील सर्वात खोल ज्ञात विवरातून गुहेत प्रवेश करता येऊ शकतो. हे Mare Tranquillitatis मध्ये स्थित आहे. हे असं ठिकाण आहे, जिथे 200 हून अधिक लहान-मोठी विवरं सापडली आहेत. ही विवरं लाव्हा ट्युब कोसळल्याने तयार झाली असावीत.
advertisement
अमेरिकन अंतराळ संस्था असलेली नासा चंद्रावर सेमी-परमनंट क्रू बेस तयार करण्याच्या उद्दिष्टाने काम करत आहे. चीन आणि रशियाला देखील चंद्रावर संशोधन तळ उभारण्यात रस आहे. पण, वैश्विक किरणोत्सर्गाचा धोका नसताना आणि स्थिर तापमान असलेलं वातावरण असेल तरच चंद्रावर तळ तयार केला जाऊ शकतो. आता चंद्रावर गुहा आढळल्यामुळे, आपत्कालीन निवाऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या गुहेत अंतराळवीरांचं नैसर्गिकरित्या हानिकारक वैश्विक किरणोत्सर्ग, सौर किरणोत्सर्ग आणि सूक्ष्म उल्का यांपासून संरक्षण होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2024 11:18 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Cave on Moon: चंद्रावर सापडलं 'घर'! तिथं राहू शकतो माणूस; ती जागा पाहून शास्त्रज्ञही थक्क