Success Story : पारंपरिक मेंढीपालन व्यवसाय भारीच, महिन्याला शांताराम यांची 1 लाख कमाई, सांगितला यशाचा मार्ग
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
शांताराम पिसाळ यांच्याकडे शेकडो मेंढ्यांचा मोठा कळप आहे. या मेंढ्यांचं दूध ते स्थानिक बाजारात विकतात.
बीडपासूनच काही अंतरावर राहणारे शांताराम पिसाळ हे पारंपरिक पद्धतीने मेंढीपालन करणारे अनुभवी मेंढपाळ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या मेंढ्यांच्या कळपासह महाराष्ट्रातील विविध भागांत फिरत आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि थंडी कोणताही ऋतू असो, त्यांच्या जीवनात विश्रांतीला जागा नाही. मेंढ्यांसाठी हिरवळ आणि पाण्याचा शोध घेत दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करतात. घरापासून महिनोनमहिने दूर राहून त्यांनी हा व्यवसाय जिद्दीने पुढे चालवला आहे.
advertisement
शांताराम पिसाळ यांच्याकडे शेकडो मेंढ्यांचा मोठा कळप आहे. या मेंढ्यांचं दूध ते स्थानिक बाजारात विकतात. मेंढीच्या दुधाला औषधी गुणधर्म असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागांतही त्याची मागणी वाढली आहे. पिसाळ सांगतात की, मेंढीचं दूध 50 ते 60 रुपये प्रति लिटर या दराने सहज विकलं जातं आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळतं. ग्रामीण भागातील लोक हे दूध आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे आवडीने खरेदी करतात.
advertisement
दुधाबरोबरच मेंढ्यांची लोकर हीसुद्धा त्यांच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे. वर्षातून एकदा कापली जाणारी लोकर प्रति किलो 40 ते 45 रुपये दराने विकली जाते. स्थानिक व्यापारी आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित लोक या लोकरीची खरेदी करतात. या व्यवसायामुळे शांताराम पिसाळ यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर झालं आहे.
advertisement
याशिवाय मेंढ्या आणि पिल्लांची विक्री हा त्यांच्या व्यवसायाचा सर्वात नफा देणारा भाग आहे. एक प्रौढ मेंढी 10 ते 11 हजार रुपयांना विकली जाते, तर पिल्लू 5 ते 6 हजार रुपयांपर्यंत विक्रीला जातं. वर्षभरात अशा अनेक विक्री व्यवहारांमुळे त्यांना मोठं उत्पन्न मिळतं. मेंढ्यांची योग्य काळजी, वेळेवर औषधोपचार आणि चारा यामुळे त्यांचा कळप तंदुरुस्त राहतो आणि उत्पन्नात सातत्य टिकतं.
advertisement
एकूणच, ऊन, वारा, पाऊस सहन करत, घरापासून दूर राहून शांताराम पिसाळ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ग्रामीण उद्योजकतेचं उत्तम उदाहरण निर्माण केलं आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक दृष्टिकोन दिल्यास आर्थिक प्रगती शक्य होते हे त्यांनी सिद्ध केलं आहे. आज ते मेंढीपालनातून महिन्याला किमान 1 लाख रुपयांची कमाई करतात. त्यांच्या चिकाटी आणि परिश्रमामुळे अनेक तरुणांना या व्यवसायाकडे आकर्षित होण्याची प्रेरणा मिळत आहे.


