Mumbai Rain: 24 तास धोक्याचे! मुंबईसह कोकणावर अतिवृष्टीचं संकट, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. आज अतिवृष्टीचा धोका असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर गेल्या आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे. आज 26 जुलै रोजीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातील इतर जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असून अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
advertisement
मुंबईमध्ये आज काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सलग दुसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ढगाळ आकाश आणि समुद्रात उंच लाटांचा इशारा दिला गेला असून, लाटांची उंची 4.67मीटरपर्यंत पोहोचू शकते. विशेषतः दुपारनंतर शहरात जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. यामुळे वाहतूक आणि जलवाहिन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने येथेही ऑरेंज अलर्ट लागू केला आहे. या दोन्ही ठिकाणी पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे रस्ते खड्डेमय होण्याची शक्यता असून, नागरिकांनी अत्यावश्यक असल्यासच प्रवास करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शाळा आणि कार्यालयांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. आज 26 जुलैला अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी सुरू असून येत्या 24 तासांत काही ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
advertisement
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये आठवडाभर ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये आजही मुसळधार पावसाचा जोर राहणार आहे. विशेषतः सिंधुदुर्गात काही ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता असून, तेथील डोंगराळ आणि नदीकाठच्या भागांमध्ये भूस्खलन किंवा पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये दक्षतेचा आदेश दिला आहे.


