गँगवॉरमधून आयुष कोमकरची हत्या, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ayush Komkar Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठेत गोळीबाराची घटना घडली.
Ayush Komkar Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठेत गोळीबाराची घटना घडली. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा खून करण्यात आला. या घटनेनंतर आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर यांच्यासह एकूण 11 जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय 18, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी बंडूअण्णा आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय 37) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहत होता. शुक्रवारी (5 सप्टेंबर) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावताना, अमन खान आणि यश पाटील हे दबा धरून बसले होते. दोघांनी पिस्तुलातून गोळीबार करून आयुषचा खून केला.
advertisement
या खुनाचा कट बंडूअण्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी रचल्याचा आरोप आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना टोळीतील इतर सदस्यांनी मदत केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 7:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
गँगवॉरमधून आयुष कोमकरची हत्या, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल