महाराष्ट्र दादांना निरोप देत होता अन् 'त्यांनी' डाव साधला, बारामतीत 8 हजार पोलिसांच्या गराड्यात धक्कादायक प्रकार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कडक पोलीस बंदोबस्तात आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत चोरट्यांनी तब्बल १५ हून अधिक लोकांचे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे बारामतीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे
बारामती: दिवंगत नेते अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी बारामती दुःखात बुडाली असताना, या अत्यंत भावूक वातावरणाचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. कडक पोलीस बंदोबस्तात आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत चोरट्यांनी तब्बल १५ हून अधिक लोकांचे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे बारामतीमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी आतापर्यंत ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हजारो पोलिसांच्या डोळ्यादेखत चोरी
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंचा समुदाय जमला होता. सुरक्षेसाठी तब्बल ८ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असतानाही चोरट्यांनी चोऱ्यांचे धाडस केले. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीने नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन आणि महागड्या दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्याच ठिकाणी हे प्रकार घडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
advertisement
चोरट्यांची धरपकड आणि नागरिकांचा चोप
चोरीचा प्रयत्न करत असताना काही सावध नागरिकांनी काही चोरट्यांना रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी त्यांना चांगलाच चोप दिला. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी बीड, यवतमाळ आणि इंदापूर येथील सहा संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये राजकुमार आठवले (बीड), महम्मद अनिस, येजाज मिरावले, मोहमद सादिक (यवतमाळ) आणि बाळू बोत्रे (इंदापूर) यांचा समावेश आहे.
advertisement
१५ हून अधिकांची लूट
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीप्रकरणी आतापर्यंत ८ ते १० अधिकृत तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये रणजित जाधव, रमेश वाबळे, विजया पवार, नीलेश काटे यांसह अनेकांच्या सोन्याच्या चेन आणि दागिने चोरीला गेले आहेत. या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 8:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
महाराष्ट्र दादांना निरोप देत होता अन् 'त्यांनी' डाव साधला, बारामतीत 8 हजार पोलिसांच्या गराड्यात धक्कादायक प्रकार










