Pune Traffic: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गासाठी मोठा निर्णय, वाहतूक कोंडी फुटणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Pune Traffic: तळेगाव–चाकण–शिक्रापुर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर एन एच 548 डी या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी एकूण 59.75 कोटी निधीस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या बहुचर्चित महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असबन अपघातांचा धोका कमी होणार आहे. या निर्णयामुळे मावळ, खेडसह शिरुर तालुक्यातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला
जात आहे.
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण 59.75 कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच या निर्णयामुळे तळेगाव–चाकण–शिक्रापुर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे हस्तांतरित
advertisement
तळेगांव-चाकण-शिक्रापूर या मार्गात तळेगांव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता व चाकण ते शिक्रापूर दरम्यान सहा पदरी रस्ता या कामाचा समावेश आहे. हे संपूर्ण काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर बांधण्यात येणार आहे.या मार्गाचा समावेश पूर्वी राज्य रस्ते विकास आराखडा 2001-2021 अंतर्गत करण्यात आला होता. त्यानंतर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग 548 डी असा दर्जा दिला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) तो महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे (MSIDC) हस्तांतरित करण्यात आला आहे.
advertisement
वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका
सद्यस्थितीत तळेगाव–चाकण–शिक्रापूर हा महामार्ग अतिवृष्टीमुळे खचला असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व रुंदीकरण आवश्यक झाले होते. हा मार्ग औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे येथे आवजड वाहतुकीची मोठी वर्दळ असते. परिणामी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि रस्ता सुरक्षेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. हा महामार्ग परिसरातील मुख्य रस्त्यांना जोडणारा एकमेव महत्त्वाचा रस्ता असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुरुस्तीची मागणी होत होती.
advertisement
तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
यासंदर्भात 30 रोजी पुणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून आता आवश्यक निधीस मान्यता देण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2025 7:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गासाठी मोठा निर्णय, वाहतूक कोंडी फुटणार