डिजिटल अरेस्टचा झोप उडवणारा प्रकार, बँक स्टाफही थक्क, डोळ्यासमोर झाले 4 हजार 236 Transactions; 22.92 कोटी उडवले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Digital Arrest Scam: दिल्लीतील 78 वर्षीय निवृत्त बँकर सहा आठवड्यांसाठी स्कॅमरच्या ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये अडकले. फोनवरच्या आदेशाने त्यांनी तब्बल 22.92 कोटी रुपये 21 व्यवहारांतून 16 खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील अपमार्केट गुलमोहर पार्कमध्ये दररोजच्या गाठीभेटी, कॉलनी पार्कमध्ये फेरफटका, जवळच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा, क्लबला भेटी – मागील सहा आठवड्यांमध्ये 78 वर्षीय निवृत्त बँकर नरेश मल्होत्रा यांच्यासाठी हे सगळं अगदी नेहमीसारखंच चालू होतं. पण या काळात त्यांनी त्यांच्या तीन बँक खात्यांमधून एकूण 22.92 कोटी रुपये 21 व्यवहारांतून 16 वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
advertisement
ज्या शाखांमधून इतकी मोठी रक्कम हलवली जात होती त्या बँक मॅनेजरनाही काही संशय आला नाही. एका शाखेत तर ते पैसे ट्रान्सफर होत असतानाच चहा घेत बसत. पण खरं म्हणजे मल्होत्रा “डिजिटल अरेस्ट” मध्ये होते. कथित ईडी (Enforcement Directorate) आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी म्हणून वावरणाऱ्या स्कॅमरकडून ते प्रत्येक छोट्या रकमेच्या खर्चासाठीसुद्धा परवानगी घेत होते.
advertisement
मल्होत्रा म्हणाले, जणू मी भूतबाधेत होतो. माझं शुद्ध-बुद्ध, विचार करण्याची क्षमता पूर्णपणे स्कॅमरकडे होती.
सहा आठवड्यांनी त्यांनी धैर्य एकवटून 19 सप्टेंबरला तक्रार दाखल केली. त्याच दिवशी एफआयआर नोंद झाली आणि दिल्ली पोलिसांसमोर या गुंतागुंतीच्या मनी-ट्रेलचा शोध घेण्याचं आव्हान उभं राहिलं.
advertisement
21 व्यवहारांतून गेलेले पैसे तब्बल 7 स्तरांत विभागले गेले. या काळात एकूण 4,236 व्यवहार झाले. दिल्ली पोलिसांच्या IFSO शाखेचे संयुक्त आयुक्त राजनीश गुप्ता यांनी सांगितले की- चोरीच्या रकमेला अशा प्रकारे “लेयरिंग” करणं नेहमीचं आहे. आम्ही 20 स्तरांत पैसे हलवताना पाहिले आहेत. इथे महत्त्वाचा ‘गोल्डन अवर’ वाया गेला. तात्काळ तक्रार न झाल्यामुळे पैसे फ्रीझ करणं किंवा आरोपींना पकडणं कठीण झालं.
advertisement
4 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान मल्होत्रांनी 3 बँक शाखांना 21 वेळा भेट दिली. 21 आरटीजीएस व्यवहारांतून त्यांनी 16 खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. येस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, युनियन बँक, अॅक्सिस बँक या शाखांत पैसे गेले. व्यवहार उत्तराखंडपासून पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडूपर्यंत झाले; पण दिल्लीतील एकाही बँकेत गेले नाहीत.
advertisement
मल्होत्रांनी सरकारी आणि खासगी बँकांमध्ये पाच दशकं वरिष्ठ पदावर काम केलं होतं. 2020 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्या घराजवळच्या शाखांमधूनच हे व्यवहार झाले – स्थानिक कॉलनीतील सेंट्रल बँक शाखा फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आणि एचडीएफसी व कोटक महिंद्रा बँक दहा मिनिटांच्या अंतरावर. पण बँक मॅनेजरना काही संशय आला नाही.
advertisement
जॉइंट कमिशनर गुप्ता यांच्या मते- आत्तापर्यंत 2.67 कोटी रुपये फ्रीझ करण्यात आले आहेत. पण ही रक्कम फारच कमी आहे. अजून खूप अंतर गाठायचं आहे.
घटनेचा सुरुवात 1 ऑगस्टला झाली. एका अनोळखी कॉलवर मल्होत्रांना सांगण्यात आलं की त्यांच्या ओळखीचा वापर दहशतवादासाठी निधी पुरवण्यात झाला आहे. यावरून सुटका हवी असेल तर आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाला ‘शुरिटी’ म्हणून पैसे द्यावे लागतील आणि नंतर ते परत केले जातील.
मल्होत्रांनी संपूर्ण सहा आठवडे आपल्या कुटुंबीयांपासून, मित्रमैत्रिणींनपासून ही गोष्ट लपवली. अगदी घरखर्चासाठी किंवा स्टाफचा पगार देण्यासाठी पैसे काढायचे असले तरी स्कॅमरची परवानगी घ्यावी लागायची. माझं जीवनच त्यांनी हाती घेतलं होतं, असे ते म्हणाले.
एचडीएफसीच्या डिमॅट अकाउंटमधील गुंतवणूक त्यांनी तीन खात्यांमध्ये वळवली आणि नंतर 21 हप्त्यांमध्ये 16 वेगवेगळ्या खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले. 22.92 कोटी रुपये फसवणुकीने घेऊन झाल्यावर स्कॅमरने आणखी 5 कोटींची मागणी केली.
19 सप्टेंबरला त्यांनी 5 कोटींची मागणी केली. तेव्हा मल्होत्रांनी नकार दिला. मी म्हटलं की मी खाजगी कंपनीच्या खात्यात पैसे टाकणार नाही. मी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे थेट जमा करीन. त्यांनी मला अटक करण्याची धमकी दिली. मी म्हटलं, करा अटक. माझ्या या विरोधानंतर त्यांनी फोन कट केला आणि सगळं थांबलं, मल्होत्रा यांनी सांगितलं.
एफआयआरनुसार त्यांनी सेंट्रल बँकेतून 9.68 कोटी, एचडीएफसी बँकेतून 8.34 कोटी आणि कोटक महिंद्रा बँकेतून 4.90 कोटी रुपये काढले. दोन बँकांच्या मॅनेजरना या प्रकरणाची माहिती नव्हती तर तिसऱ्या बँकेच्या मॅनेजरने सांगितलं की मल्होत्रा वारंवार शाखेत येत असल्यामुळे त्यांना काही संशय आला नाही. ते नेहमीसारखं बोलत, शांत बसत आणि कधी कधी चहा घेत असताना मोठमोठे व्यवहार करत. त्यामुळे स्टाफला काही संशय आला नाही, असं त्यांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/देश/
डिजिटल अरेस्टचा झोप उडवणारा प्रकार, बँक स्टाफही थक्क, डोळ्यासमोर झाले 4 हजार 236 Transactions; 22.92 कोटी उडवले