धाराशिवमधून गायब झाला 12 वर्षाचा मुलगा; सगळीकडे शोधलं, शेवटी 10 दिवसांनी पुण्यात मध्यरात्री या अवस्थेत सापडला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
धाराशिव ते थेट बंगळुरू आणि तिथून पुन्हा पुण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा थरारक ठरला. रविवारी रात्री पुण्याच्या बिबवेवाडी अप्पर डेपोमध्ये माणुसकीचे दर्शन घडल्याने या मुलाचा जीव वाचला.
पुणे : तब्बल दहा दिवस घरापासून दूर, अनोळखी रस्ते, भूक आणि भीतीचा सामना करणारा १२ वर्षांचा स्वप्निल अखेर सुखरूप आईच्या कुशीत परतला आहे. धाराशिव ते थेट बंगळुरू आणि तिथून पुन्हा पुण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा थरारक ठरला. रविवारी रात्री पुण्याच्या बिबवेवाडी अप्पर डेपोमध्ये माणुसकीचे दर्शन घडल्याने या मुलाचा जीव वाचला.
नेमकं काय घडलं?
मूळचा धाराशिव जिल्ह्यातील असलेला स्वप्निल आठ-दहा दिवसांपूर्वी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मुलगा घरात नसल्याचे पाहून पालकांनी सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर हताश होऊन त्यांनी धाराशिव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, स्वप्निलने धाराशिवहून बंगळुरू गाठले आणि तिथून तो पुण्याला पोहोचला.
advertisement
रात्री १ वाजता देवदूत धावून आला
१ मार्च रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास बिबवेवाडी अप्पर डेपोमध्ये एक मुलगा एकटाच बसलेला सामाजिक कार्यकर्ते विशाल नगरकर यांना दिसला. त्यांनी सुरक्षा रक्षक मोसिम पटेल यांच्या मदतीने मुलाला विश्वासात घेतले. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता, पण प्रेमाने विचारल्यावर त्याने आईचा मोबाईल नंबर दिला.
आईचा फोनवरच हंबरडा
नगरकर यांनी त्या नंबरवर फोन लावताच स्वप्निलच्या आईने पलीकडून हंबरडा फोडला. "माझं पिलू १० दिवसांपासून बेपत्ता होतं, आम्ही जगण्याची आशा सोडून दिली होती," असे म्हणताना आईचा कंठ दाटून आला. बिबवेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत स्वप्निलचा ताबा घेतला आणि त्याला पुण्यात राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांकडे सुखरूप सोपवले. १० दिवसांच्या वनवासानंतर आपल्या लेकाला सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 8:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
धाराशिवमधून गायब झाला 12 वर्षाचा मुलगा; सगळीकडे शोधलं, शेवटी 10 दिवसांनी पुण्यात मध्यरात्री या अवस्थेत सापडला









