आधी चार वाहनांना उडवलं; मग भरचौकात पोलिसाला गाडीत खेचून अपहरणाचा प्रयत्न, पुण्याच्या रस्त्यावर 'फिल्मी थरार'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी या वाहनाचा संशयास्पद वेग पाहून स्वतः पाठलाग सुरू केला. ही कार शिवणेकडून वारजे हायवे चौकाकडे अतिशय वेगाने धावत होती
पुणे : उत्तमनगर आणि वारजे परिसरात एका टुरिस्ट कारने दहशत माजवली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने अनेक वाहनांना धडक देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर, अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वाहतूक पोलिसालाच चक्क त्याने गाडीत ओढून घेत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी या वाहनाचा संशयास्पद वेग पाहून स्वतः पाठलाग सुरू केला. ही कार शिवणेकडून वारजे हायवे चौकाकडे अतिशय वेगाने धावत होती. वाटेत या कारने ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली.
advertisement
भर चौकात पोलिसाला गाडीत ओढले
वारजे हायवे चौकात ही कार आली असता, तिथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी कार चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी एका पोलिसाचा हात पकडून त्याला थेट कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, मागून येणारे वरिष्ठ निरीक्षक क्षीरसागर यांनी तत्काळ धाव घेत कार गाठली आणि आरोपीला भर चौकातच हिसका दाखवत जेरबंद केलं.
advertisement
पकडण्यात आलेल्या चालकाची तपासणी केली असता तो पूर्णपणे मद्यधुंद असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून, निरीक्षक क्षीरसागर यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या तत्परतेमुळे या चालकाने आणखी इतर गाड्यांना धडक दिली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 1:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आधी चार वाहनांना उडवलं; मग भरचौकात पोलिसाला गाडीत खेचून अपहरणाचा प्रयत्न, पुण्याच्या रस्त्यावर 'फिल्मी थरार'








