Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक, भव्य रथ अन् सप्तरंगी सजावट, यंदा काय खास?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Dagdusheth Ganpati: अनंत चतुर्दशीला दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचे पुणेकरांना नेहमीच आकर्षण असते. यंदा विसर्जन मिरवणुकीचे खास नियोजन करण्यात आले आहे.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 133 व्या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शनिवार, 6 सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात निघणार आहे. विशेष म्हणजे, श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ गणपती विराजमान होणार असून, हा रथ आकर्षक विद्युतरोषणाईने उजळून निघणार आहे.
सलग तिसऱ्या वर्षी दुपारी 4 वाजता बेलबाग चौकातून ही मिरवणूक निघणार असून, यंदाच्या प्रतिकृतीचा विषय केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. दक्षिण भारतीय शैलीत तयार करण्यात आलेला हा रथ 16 बाय 16 फूट आकाराचा असून त्याची उंची तब्बल 24 फूट आहे. रथावर झुंबरे, एलईडी लाईट्स आणि पार लाईट फोकस लावण्यात आले आहेत. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी हा भव्य रथ साकारला आहे.
advertisement
रथावर 4 गरुडमूर्ती बसवण्यात आल्या आहेत, ज्यापैकी दोन मूर्ती 6 फूट उंचीच्या आणि दोन 3 फूट उंचीच्या आहेत. दक्षिण भारतातील लाकडी रथांच्या परंपरेनुसार त्याची रचना करण्यात आली असून, सप्तरंगी सजावटीमुळे रथ अधिकच आकर्षक भासणार आहे.
advertisement
सांगता मिरवणुकीत मानवसेवा रथ अग्रभागी असणार आहे. त्यामध्ये सनई-चौघड्यांचा गजर असणार असून, स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक असे विविध सांस्कृतिक लवाजमे मिरवणुकीला रंगतदार बनवतील. पुरुषांसह महिला गणेशभक्तांचाही मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, दगडूशेठ गणपतीची सांगता मिरवणूक ही श्रद्धा, परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असतो. यंदाही भाविकांसाठी ही मिरवणूक अविस्मरणीय ठरणार आहे. शहरातील भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, शनिवारी दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 05, 2025 1:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक, भव्य रथ अन् सप्तरंगी सजावट, यंदा काय खास?






