पुन्हा डोकं वर काढतोय महारोग, पुणे विभागातून धडकी भरवणारी आकडेवारी समोर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Health: पुणे परिमंडळात धोकादायक आजाराने डोकं वर काढलं आहे. तब्बल 629 रुग्ण आढळले असून आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत.
पुणे: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यावर्षीही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात आले होते. राज्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान अनेक नवीन कुष्ठरोग रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील 8.66 कोटी लोकसंख्येपैकी 8.49 कोटी लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. 10 डिसेंबरपर्यंत 5,18,219 संशयितांपैकी 5,02,263 जणांची तपासणी करण्यात आली आणि यामध्ये 5,938 नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली.
पुणे परिमंडळात एकूण 629 नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून त्यात पुणे जिल्ह्यात 160, साताऱ्यात 389 आणि सोलापूरमध्ये 116 रुग्णांचा समावेश आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 511, साताऱ्यात 389, गडचिरोलीत 337, नागपूरमध्ये 323 आणि यवतमाळमध्ये 309 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्य सरकारने हा आजार 30 ऑक्टोबरपासून अधिसूचित जाहीर केल्यामुळे यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
advertisement
कुष्ठरोग प्रतिबंधासाठी जिल्ह्यांना सूचना
ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण अजून पूर्ण झाले नाही, त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करावे. सर्वेक्षणात आढळलेले रुग्ण तात्काळ नोंद प्रणालीवर नोंदवावेत. त्वचारोग तज्ज्ञांनी बैठक घेऊन रुग्ण निदानाचा अहवाल दोन आठवड्यांत द्यावा. जिल्ह्यांनी रुग्णाशी थेट संपर्कात येणाऱ्या लोकांना पीईपीसाठी रिफाम्पिसिनची एक मात्रा द्यावी.
advertisement
कोणत्याही लाभार्थीला मात्रा मिळाली नसेल, तर पुढील दोन दिवसांत ‘मॉपअप राउंड’ घेऊन त्यांना द्यावी. एका रुग्णाच्या आसपास राहणाऱ्या 30 लोकांची ओळख करून त्यांना पीईपी द्यावी. जिल्ह्यांतील जोखीम जास्त असलेल्या भागातील 10 टक्के रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी अधिकारी आणि पथकांनी करावी. पीईपीचा अहवाल जिल्ह्यांनी सादर करणे आवश्यक आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 11:43 AM IST









