गुलाबी अन् चवीला एकदम भारी, पुण्यात आले 'रॉयल गाला' सफरचंद, किती आहे दर?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Poland Royal Gala Apples: गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात परदेशी सफरचंदांची आवक झपाट्याने वाढत असून, त्यात पोलंडच्या रॉयल गाला सफरचंदाने बाजी मारलेली दिसत आहे.
पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात परदेशी सफरचंदांची आवक झपाट्याने वाढत असून, त्यात पोलंडच्या रॉयल गाला सफरचंदाने बाजी मारलेली दिसत आहे. देशी सफरचंदाचा हंगाम जवळपास समाप्तीला आल्यानंतर बाजारात परदेशी मालाचे वर्चस्व वाढले आहे. पोलंड, इटली, अमेरिका, इराण, अफगाणिस्तान अशा अनेक देशांतून सफरचंद येत असले तरी रॉयल गाला सफरचंदाने ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या पोलंडमधून येणाऱ्या 18 किलो वजनाच्या पेटीला 4000 ते 4200 रुपये इतका दर मिळत आहे. मागील वर्षी याच प्रकारच्या मालाला 2800 ते 3000 रुपये इतका भाव मिळाला होता. म्हणजेच यावर्षीच्या दरात तब्बल 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामागे पोलंडमधील चांगला हंगाम, टिकाऊपणा, उत्तम चव आणि उच्च दर्जाची गुणवत्ता ही प्रमुख कारणे असल्याचे व्यापारी सांगतात.
advertisement
डी. बी. उरसळ अँड ग्रँडसन्सचे संचालक आणि आयातदार रोहन उरसळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलंडच्या सफरचंदाची भारतातील मागणी गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला केवळ 3 कंटेनरने सुरू झालेली पोलंड ॲपलची आयात आता वार्षिक 100 पेक्षा अधिक कंटेनरपर्यंत पोहोचली आहे. भारतात सफरचंदांचे प्रचंड मार्केट आहे. हिमाचल आणि काश्मीरमधील हंगाम सप्टेंबरपासून सुरु होतो. हिमाचलचा माल संपला की काश्मीरचा माल बाजारात येतो. पण स्थानिक मालाची उपलब्धता मर्यादित झाल्यावर परदेशी सफरचंदांना मोठी मागणी निर्माण होते, असे उरसळ यांनी सांगितले.
advertisement
यंदा टर्कीमधील उत्पादन तब्बल 60 टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे बाजारात पोलंडच्या सफरचंदांचे प्रमाण वाढले असून मागणीही वाढली आहे. इटली आणि ग्रीस येथूनही काही प्रमाणात माल येतो, मात्र पोलंडच्या तुलनेत त्याचा पुरवठा कमी आहे. अमेरिका येथील सफरचंदांची 20 किलो पेटी 5000 ते 5200 रुपयांपर्यंत विकली जात आहे, तर इराण व अफगाणिस्तान येथील 10 किलोचा माल 1000 ते 1200 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
पोलंडच्या रॉयल गाला सफरचंदांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा चमकदार लाल रंग, दीर्घ काळ टिकून राहणारी गुणवत्ता. चांगल्या गुणवत्तेला लोक आता भाव देतात. त्यामुळे घाऊक बाजारातील दर 230 ते 250 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई बंदरावरून समुद्रमार्गाने आलेला हा माल पुढे रस्तेमार्गे पुणे आणि महाराष्ट्रातील इतर फळबाजारांत पोहोचतो. एप्रिल ते जुनपर्यंत पोलंडच्या सफरचंदांचा हंगाम सुरू राहणार असल्याने पुढील काही महिन्यांतही या सफरचंदांची बाजारात उपस्थिती राहणार आहे.
advertisement
पुण्यातील ग्राहकांमध्ये परदेशी सफरचंदांची मागणी स्थिर असून, त्यातून बाजाराचा कलही बदलताना दिसतो. देशी माल मर्यादित झाल्यावर पोलंडचा रॉयल गाला हा पर्याय अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करत आहे. परिणामी, पुण्याच्या बाजारात या सफरचंदाचे वर्चस्व पाहिला मिळत असून मागणी ही चांगली मिळत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 18, 2025 9:23 PM IST

