हत्या, अपघात की.., पुण्यात रस्त्यावर आढळला कापलेला पाय, मॉर्निंग वॉक करताना भयंकर प्रकार समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एका रस्त्याच्या कडेला एका पुरुषाचा कापलेला पाय आढळला आहे.
पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला एका पुरुषाचा कापलेला पाय आढळला आहे. बुधवारी सकाळी काही स्थानिक नागरिक या रस्त्यावर फिरायला गेले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक तुटलेला पाय नागरिकांना आढळून आला. हा प्रकार उघडकीस एकच गोंधळ उडाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पायाबद्दल आता वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी हा अर्धा कापलेला पाय रस्त्याच्या कडेला पडलेला पाहिला. सुरुवातीला अनेकांना तो प्राण्याचा अवयव वाटला, परंतु जवळ जाऊन पाहिल्यावर तो मानवी शरीराचा भाग असल्याचं स्पष्ट झालं. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
पायात मोजा, मृतदेहाचा उर्वरित भाग दुसरीकडे?
माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसराची सुरक्षा घेराबंदी केली आणि पंचनामा केला.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, हा कापलेला अवयव एका पुरुषाचा असून तो डावा पाय आहे. पायात मोजा असल्याने हा प्रसंग अत्यंत अचानक घडल्याचे किंवा तो पाय अत्यंत क्रूरपणे कापल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मृतदेहाचा उर्वरित भाग कुठेतरी दुसरीकडे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांकडून कसून तपास सुरू, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या घटनेमागे भीषण अपघात, खून, किंवा इतर कोणताही गंभीर गुन्हा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली आहे. या घटनेचं नेमकं स्वरूप अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एपीआय राजकुमार डुणगे यांनी सांगितले की, "पाय ज्या प्रकारे कापलेला आहे, त्यावरून तो अपघातात सुटलेला आहे की एखाद्या गुन्ह्याचा भाग आहे, हे तपासणं आमचं प्राधान्य आहे."
advertisement
पोलिसांनी सध्या जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच, इंदापूर, नीमसाखर, बारामती आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांशी संपर्क साधून गेल्या २४ तासांत कोणत्या व्यक्तीचा अपघात किंवा इतर कारणामुळे पाय कापल्याची घटना घडली आहे का, याची चौकशी सुरू केली आहे. या भयानक घटनेमुळे इंदापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या गूढ घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा कसून प्रयत्न करत आहेत.
view commentsLocation :
Indapur,Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हत्या, अपघात की.., पुण्यात रस्त्यावर आढळला कापलेला पाय, मॉर्निंग वॉक करताना भयंकर प्रकार समोर


