Ganesh Visarjan 2025 : पुढच्या वर्षी लवकर या...! गणेश विसर्जनासाठी पिंपरीतील घाटांवर वैद्यकीय पथक तैनात
Last Updated:
Pimpri Ganesh Visarjan 2025 : पिंपरी-चिंचवड महापालिकेने गणेश विसर्जनासाठी प्रमुख घाटांवर वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका तैनात केली आहेत. अधिकारी, परिचारिका आणि मदतनीस सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी औषधसाठा तसेच आवश्यक उपकरणे उपलब्ध आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख घाटांवर वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका तैनात केली आहेत. आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, मदतनीस, रुग्णवाहिका चालक तसेच सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे. प्रत्येक पथकाला आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय साहित्य आणि सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा त्वरीत मुकाबला करता येईल. या पथकांचे मुख्य समन्वयक म्हणून सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वैद्यकीय पथक पिंपरी-चिंचवडमधील गणेश तलाव, वाल्हेकरवाडीतील जाधव घाट, काळेवाडी स्मशान घाट, पिंपरी सुभाषनगर घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, केजुदेवी बंधारा घाट, सांगवी घाट आणि पिपळे गुरव येथील घाटांवर तैनात आहेत. महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे विसर्जनावेळी नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणार असून, कोणत्याही गंभीर अपघाताची शक्यता कमी होईल.
advertisement
गणेश विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यात मिसळते, ज्यामुळे जलप्रदूषण वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी निर्माल्य संकलन कुंड बसवण्यात आले आहेत. नागरिकांनी हार, फुले, पाने आणि पूजेसामग्री या कुंडांमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकलित केलेले निर्माल्य नंतर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाईल. त्याचबरोबर यावर प्रक्रिया करून सुगंधी द्रव्य तयार करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
advertisement
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी सांगितले की, विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका सज्ज असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक उपकरणे तसेच औषधसाठा देण्यात आला आहे. तत्काळ उपचार आणि रुग्णवाहिका सेवेमुळे कुठलीही आपत्कालीन परिस्थिती तत्काळ हाताळता येईल. नागरिकांनी महापालिकेच्या मार्गदर्शनाचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विसर्जन सुनिश्चित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 7:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganesh Visarjan 2025 : पुढच्या वर्षी लवकर या...! गणेश विसर्जनासाठी पिंपरीतील घाटांवर वैद्यकीय पथक तैनात


