पुणे-सोलापूर महामार्गालगत होतं 'पान शॉप'; ते खाण्याचं पान उघडून बघताच पोलीसही हादरले, दोघांना लगेचच अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अवघ्या ३५ रुपयांत मिळणाऱ्या या एका पानाची नशा दारूच्या एका बाटलीइतकी भीषण असल्याचे समोर आले आहे.
लोणी काळभोर : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात पानशॉपच्या नावाखाली भलतंच काहीतरी सुरू होतं. पान विक्रीच्या नावाखाली नशेचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा आता पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कदमवाकवस्ती येथील 'मैफील पानशॉप'वर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत अंमली पदार्थमिश्रित पाने आणि इतर साहित्य असा सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी मोबाईल टेस्टिंग मशीनच्या सहाय्याने तपास केला असता, या पानांमध्ये अॅम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स आणि ओपिएट्स सारखे जीवघेणे अंमली पदार्थ मिसळले जात असल्याचे उघड झाले. अवघ्या ३५ रुपयांत मिळणाऱ्या या एका पानाची नशा दारूच्या एका बाटलीइतकी भीषण असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दुकानमालक निशांत काळभोर (१९) आणि कामगार रामजी पटेल (३३) यांना अटक करण्यात आली असून, रोहित जवळकर हा आरोपी अद्याप फरार आहे.
advertisement
विद्यार्थी निशाण्यावर
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही नशेली पाने खाल्ल्यावर दारू किंवा सिगारेटसारखा कोणताही वास येत नाही. त्यामुळे आपली मुले नशा करत आहेत, हे पालकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. शैक्षणिक संस्था, हॉस्टेल आणि कॉलेज परिसरातील पानटपऱ्यांवर ही विक्री जोरात सुरू असून, तरुण पिढी छुप्या पद्धतीने या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे.
पूर्व हवेली परिसरात अशा प्रकारे २०० हून अधिक ठिकाणी ही 'नशेची दुकाने' सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, इतर पान विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, या धक्कादायक प्रकरणांमुळे आणि अशा प्रकारे अनेक ठिकाणी विक्री सुरू असल्याचं समोर आल्यानं पालकांची चिंता वाढली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 7:02 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-सोलापूर महामार्गालगत होतं 'पान शॉप'; ते खाण्याचं पान उघडून बघताच पोलीसही हादरले, दोघांना लगेचच अटक







