प्रेमात संमोहित करून लग्न केलं अन्.., हिंदू धर्मात परतलेल्या पुण्याच्या सायलीचे नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासे
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
२०१९ मध्ये 'मिस इंडिया अर्थ' ठरलेली सायली सुर्वे सध्या तिच्या धर्मांतरामुळे चर्चेत आली आहे. दहा वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केलेल्या सायलीने पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.
२०१९ मध्ये 'मिस इंडिया अर्थ' ठरलेली सायली सुर्वे सध्या तिच्या धर्मांतरामुळे चर्चेत आली आहे. दहा वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केलेल्या सायलीने पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. तिने आता आपल्या सासरच्या मंडळींवर छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, लग्नासाठी थेट बळजबरी झाली नसली तरी आपल्याला 'संमोहित' करून लग्नास प्रवृत्त केल्याचा दावा तिने केला आहे.
प्रेमाच्या नावाखाली संमोहनाचा वापर?
एका मराठी वाहिनीशी संवाद साधताना सायली सुर्वेनं सांगितलं की , "माझ्यावर लग्नासाठी थेट शारीरिक बळजबरी करण्यात आली नव्हती. मात्र, प्रेमाच्या नात्यात असताना मला संमोहित करण्यात आलं होतं. त्या प्रभावाखाली राहून मी स्वतःच्या इच्छेने विवाह केला. हा प्रकार म्हणजे छुप्या पद्धतीने केलेला 'लव्ह जिहाद'च होता." लग्नानंतर तिचं नाव बदलून 'अलीझा तासे' असं ठेवण्यात आलं होतं.
advertisement
दहा वर्षांचा छळ
सायलीने १० वर्षांपूर्वी मीरा-भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासे याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच तिची स्वप्ने धुळीस मिळाली. सासरच्या लोकांकडून सातत्याने मारहाण आणि मानसिक छळ सुरू झाला. सायलीने आरोप केला की, तिने हिंदू रितीरिवाज पाळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र विरोध केला जात असे.
"माझ्या चार मुलांच्या भवितव्यासाठी मी हा सर्व अन्याय मुकाट्याने सहन केला. कुटुंबातील इतर सुनांचीही अवस्था बिकट होती," असेही तिने नमूद केले. अखेर सहनशीलतेचा अंत झाल्यावर तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आणि स्वधर्मात परतण्याचा निर्णय घेतला.
advertisement
हिंदू धर्मात विधीपूर्वक 'घरवापसी' आणि शुद्धीकरण
सायलीला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी विशेष होम-हवन आणि मंत्रोच्चाराचे आयोजन करण्यात आलं होतं. या शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव बदलून 'अद्या सुर्वे' असं ठेवण्यात आलं आहे. या प्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. अद्याने आपल्या चार मुलांनाही हिंदू धर्मात परत आणलं आहे.
advertisement
सायलीच्या सासूने काय सांगितलं?
दुसरीकडे, सायलीच्या सासू गुलशन पटेल यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. "पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत असतात. सायली आजही माझी सून आहे आणि भविष्यातही राहील," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र, अद्या सुर्वे आता आपल्या निर्णयावर ठाम आहे. "गेल्या १० वर्षांत झालेल्या अन्यायाविरुद्ध आता मी उभी राहिली आहे. मला आता कोणाचीही भीती वाटत नाही. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी हा लढा सुरूच ठेवणार आहे," असा निर्धार तिने व्यक्त केला आहे.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 7:10 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रेमात संमोहित करून लग्न केलं अन्.., हिंदू धर्मात परतलेल्या पुण्याच्या सायलीचे नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासे






