भिगवण अपहरण प्रकरण: 165 किमीचा रूट मॅप आणि 6 पथकं मागावर; पण पीडितेच्या 'त्या' कॉल डिटेल्समुळे धक्कादायक ट्विस्ट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपींनी फिल्मी स्टाईलने हल्ला करत मुलीच्या आई-भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. आई-भाऊ वेदनेने विव्हळत असतानाच आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने गाडीत ओढले आणि तिथून पसार झाले.
पुणे : भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. भरदिवसा आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकून झालेल्या या अपहरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा असा की, अपहरण करणारा मुख्य आरोपी हा पीडित तरुणीचा 'शेजारीच' असून गेल्या महिनाभरापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी दुपारी पीडित तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी जात होती. हॉटेल आनंदच्या मागे येताच, एका चारचाकी गाडीतून आलेल्या जहिर शेख आणि आयान शेख यांनी त्यांना अडवले. आरोपींनी फिल्मी स्टाईलने हल्ला करत मुलीच्या आई-भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. आई-भाऊ वेदनेने विव्हळत असतानाच आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने गाडीत ओढले आणि तिथून पसार झाले.
advertisement
पोलीस तपासातील 'तो' धक्कादायक खुलासा
भिगवण पोलिसांनी जेव्हा आरोपी आणि पीडितेचे 'कॉल डिटेल्स' तपासले, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आणि मुलगी यांच्यात गेल्या एक महिन्यापासून सातत्याने फोनवर संभाषण सुरू होते. दोघेही शेजारी असल्यामुळे त्यांच्यात ओळख होती, मात्र संवादाचे स्वरूप काय होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
तपासासाठी १६५ किमीचा 'रूट मॅप' तयार
तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून महत्त्वाची पावले उचलली आहेत. आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर धाडी टाकण्यासाठी ६ पोलीस पथके वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाठवण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी ज्या मार्गाने पळाले, तो १६५ किलोमीटरचा मार्ग ट्रेस केला आहे.
advertisement
पोलिसांचे शांततेचे आवाहन
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, परिसरात कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. "कोणीही अफवा पसरवू नये किंवा मोर्चे काढू नयेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 1:24 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
भिगवण अपहरण प्रकरण: 165 किमीचा रूट मॅप आणि 6 पथकं मागावर; पण पीडितेच्या 'त्या' कॉल डिटेल्समुळे धक्कादायक ट्विस्ट






