Pune Fraud: कंपनीच्या नावाचं बनावट मेल आयडी बनवलं अन् केला मोठा खेळ, चाकणमधील अजब प्रकारामुळे खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका सायबर चोरट्याने मूळ कंपनीच्या ईमेल आयडीशी मिळतेजुळते बनावट ईमेल आयडी तयार केले. या बनावट ईमेलचा वापर करून त्याने दोन्ही कंपन्यांमधील संवादात हस्तक्षेप केला
पिंपरी : दोन कंपन्यांमधील अधिकृत व्यवहारात हस्तक्षेप करून एका अज्ञाताने तब्बल ८ लाख ८१ हजार ९४२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी चक्क कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीसारखा हुबेहूब दिसणारा 'बनावट' ईमेल आयडी तयार करून हा प्रताप केला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
चाकण परिसरातील 'एस.के.एस. फास्टनर्स लिमिटेड' या कंपनीचा चीनमधील एका कंपनीशी व्यावसायिक पत्रव्यवहार सुरू होता. १८ नोव्हेंबर २०२४ ते १८ एप्रिल २०२५ या कालावधीत हा ऑनलाइन व्यवहार सुरू असताना, एका सायबर चोरट्याने मूळ कंपनीच्या ईमेल आयडीशी मिळतेजुळते बनावट ईमेल आयडी तयार केले. या बनावट ईमेलचा वापर करून त्याने दोन्ही कंपन्यांमधील संवादात हस्तक्षेप केला आणि विश्वासात घेऊन ८ लाख ८१ हजारांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतली.
advertisement
मोठी फसवणूक उघड
व्यवहारादरम्यान अचानक काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाला संशय आला. त्यांनी पडताळणी केली असता, त्यांच्या अधिकृत ईमेलचा गैरवापर करून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे कंपनी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (६ मार्च) कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सध्याच्या काळात ईमेल हॅकिंग आणि बनावट आयडीद्वारे होणारी फसवणूक वाढली असून, व्यावसायिक व्यवहारांमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. पोलीस आता या बनावट ईमेल आयडीचे 'आयपी ॲड्रेस' शोधून आरोपीचा शोध घेत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Fraud: कंपनीच्या नावाचं बनावट मेल आयडी बनवलं अन् केला मोठा खेळ, चाकणमधील अजब प्रकारामुळे खळबळ









