3 कोटींचा नफा डोळ्यासमोर होता, पण एक क्लिक अन् आयुष्यभराची कमाई गायब; पुण्यातील महिलेसोबत मोठा गेम
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका महिलेला तब्बल ७० लाख ७१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात शेअर बाजार आणि ट्रेडिंगच्या नावाखाली गंडवल्याची घटना घडली आहे. एका महिलेला तब्बल ७० लाख ७१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणुकीवर प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३ जून २०२४ पासून २५ मार्च २०२५ या कालावधीत घडली. सायबर चोरट्यांनी पीडित महिलेला प्रथम व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांना एका बनावट ट्रेडिंग वेबसाईटवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. 'नॅन्सी' नावाचा ग्रुप ॲडमिन, 'मिस्टर हेलन' आणि काही टेलिग्राम आयडी धारकांनी पीडितेला गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे स्वप्न दाखवले.
पीडित महिलेने वेळोवेळी एकूण ७० लाख ७१ हजार ३८९ रुपये गुंतवले. या गुंतवणुकीवर त्यांना चक्क ३ कोटी ४० लाख रुपयांचा नफा झाल्याचे बनावट वेबसाईटवर दाखवण्यात आले. मात्र, जेव्हा महिलेने ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी तो नफा मिळवण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी नॅन्सी, मिस्टर हेलन, ट्रेडिंग इन्स्ट्रक्टर आणि संबंधित टेलिग्राम आयडी धारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सायबर गुन्हेगार अशा प्रकारे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून नागरिकांना कसे लक्ष्य करत आहेत, याचे हे मोठे उदाहरण समोर आले आहे. काळेवाडी पोलीस या तांत्रिक गुन्ह्याचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी अशा अनोळखी गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 1:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
3 कोटींचा नफा डोळ्यासमोर होता, पण एक क्लिक अन् आयुष्यभराची कमाई गायब; पुण्यातील महिलेसोबत मोठा गेम







