Ganpati Visarjan Miravnuk : पुणेकरांचा उत्साह अविरत! विसर्जन मिरवणूक तब्बल 20 तासांपासून सुरू
Last Updated:
Puen Ganesh Visarjan 2025 : पुण्यातील गणेश विसर्जन 2025 मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून तब्बाल 20 तासांपासून सुरू असलेल्या जल्लोषात सांस्कृतिक कार्यक्रम आणि रंगतदार उत्सवाची रेलचेल सुरु आहे.
पुणे : पुणे आणि मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलेलं असतं. यंदाही पुण्यातील मिरवणूक विक्रमी ठरतेय. मुख्य मिरवणूक सुरू होऊन तब्बल 20 तास उलटून गेले तरीही शहरातील रस्त्यांवर अजूनही गणेश मंडळांची मिरवणूक सुरूच आहे.
रात्री 12 नंतर डीजे बंद करण्यात आल्याने बराच वेळ मिरवणूक थांबली होती. मात्र, पहाटे 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे सुरू झाल्याने मिरवणुकीला वेग आला. सकाळपासून लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवर अजूनही शेकडो मंडळांची रांग लागलेली आहे. मिरवणुकीच्या गोंगाटामुळे या भागात रात्रीपासूनच प्रचंड गर्दी दिसून आली.
दरम्यान, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन सुरळीत पार पडलं आहे. तरीही लहान-मोठ्या शेकडो सार्वजनिक मंडळांचं विसर्जन अद्याप बाकी आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती मानल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूकही पारंपरिक रथातून पहाटे 3 वाजता अलका टॉकीज चौकात दाखल झाली. ढोल-ताशांचा नाद, भंडाऱ्याचा वर्षाव आणि चमचमणाऱ्या आतषबाजीच्या रोषणाईत भाविकांनी भक्तीभावाने रंगारी गणपतीला निरोप अर्पण केला..पहाटे 3.51 वाजता या गणपतीचं विसर्जन पूर्ण झालं.
advertisement
मात्र, मिरवणुकीच्या उत्साहात काही ठिकाणी किरकोळ वाद झाले. अलका टॉकीज चौकात दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पुढे तरुणांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाद मिटवला आणि मिरवणूक सुरळीत सुरू ठेवली.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत शेकडो गणेशभक्त सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट, गुलाल-भंडाऱ्याच्या उधळणीमुळे वातावरण दुमदुमून गेलं आहे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक रात्रीपासून रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव परंपरेचा हा सोहळा अजूनही सुरू असून, पुढील काही तासांत उर्वरित मंडळांचं विसर्जन होण्याची शक्यता आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 7:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganpati Visarjan Miravnuk : पुणेकरांचा उत्साह अविरत! विसर्जन मिरवणूक तब्बल 20 तासांपासून सुरू