Inspiring Story: कलाकार घडवणाऱ्या पुणेकर, 'त्या' मुलांना मोफत शिक्षण, काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Inspiring Story: पुणेकर गिरिजा कोंडे देशमुख या गेल्या 12 वर्षांपासून मोठं काम करत आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.
पुणे : स्वतःचे करिअर बाजूला ठेवून मूकबधिर आणि अनाथ मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी पुणेकर गिरिजा कोंडे देशमुख या गेल्या अनेक वर्षांपासून नि:स्वार्थपणे कार्य करत आहेत. मुलांना चित्रकला आणि रंगभूमी यांसारख्या क्षेत्रात त्या प्रशिक्षण देतात. त्यांचं उद्दिष्ट या मुलांचा आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी निर्माण करून देणं हे असून त्यांच्या प्रयत्नांमुळे आज अनेक मूकबधिर मुलं आपले कलागुण दाखवत समाजात नाव कमावत आहेत. विशेष म्हणजे, कलाकार आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य दिलं जातं.
गिरिजा कोंडे देशमुख यांचं ह्युमन रिसोर्स या विषयातून एमबीए झालं आहे. गिरिजा यांनी सांगितले की, 2010 साली त्यांनी शतायू भवन वृद्धाश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांसोबत चित्रकलेची कार्यशाळा घेतली. हाच त्यांच्या सामाजिक प्रवासाचा पहिला टप्पा ठरला. त्यानंतर 2012 साली सिंहगड पायथ्यावरील अनाथाश्रमातील मुलींसाठी चित्रकला कार्यशाळा घेतली. 2014 मध्ये माळीण दुर्घटनेनंतर त्यांनी पीडितांसाठी मनोधैर्य वाढवणारी पत्रे तयार करून पाठवली.
advertisement
कोथरूड येथील कामायिनी संस्थेतील विशेष विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तब्बल सहा महिने मोफत चित्रकला प्रशिक्षण दिले. या मुलांच्या कलेला व्यासपीठ मिळावे म्हणून 2015 साली बालगंधर्व कलादालनात पहिल्यांदाच चित्रप्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनाला पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या 12 वर्षांपासून त्या समाजसेवा करत आहेत.
गिरिजा देशमुख यांनी 2016 मध्ये शिवचरित्र, 2018 मध्ये पंढरीची वारी आणि 2019 मध्ये 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना चित्रकलेतून श्रद्धांजली दिली. या माध्यमातून त्यांनी देशभक्तीचा संदेश दिला. 2023 साली पुणे ब्लाइंड स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने 30 फूट तिरंगा झेंडा तयार केला आणि राम मंदिर उद्घाटनानिमित्त 2000 पेपर वापरून रामसेतू बनवला.
advertisement
शिवजयंतीनिमित्त ‘स्वराज्य रथ सोहळ्यात’ त्यांनी 11 जागतिक वारसा किल्ल्यांची चित्रं फक्त 24 तासांत प्रदर्शित केली. या वर्षी मूकबधिर आणि अनाथ मुलांच्या सहभागातून 1500 फूट भारताचा झेंडा आणि 4500 अष्टलक्ष्मी पाऊल पूजन साकारण्यात आले. त्यासोबत त्या वृद्धाश्रमासाठी तसंच एचआयव्ही ग्रस्तांसाठी सुद्धा काम करत आहेत. हे सर्व कार्य त्या स्वखर्चातून करतात. त्यांच्या या समाजकार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Oct 11, 2025 3:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Inspiring Story: कलाकार घडवणाऱ्या पुणेकर, 'त्या' मुलांना मोफत शिक्षण, काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!









