Milk Price Hike : पुणेकरांच्या खिशाला कात्री! कात्रज दुधाच्या दरात वाढ; 1 मार्चपासून नवे दर लागू
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या पुणेकरांना आता दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे : आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या पुणेकरांना आता दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ मार्च २०२६ पासून हे नवीन दर लागू होणार असून, यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
का झाली ही दरवाढ?
नुकत्याच पार पडलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत २५ प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींनी हा निर्णय एकमताने घेतला. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च आणि मागील वर्षभरात दूध खरेदी दरात झालेली ४ रुपयांची वाढ यामुळे ही दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
advertisement
संस्था आणि वितरकांकडून 'दिलासा' देण्याचा प्रयत्न?
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे प्रकाश कुतवळ यांनी माहिती दिली की, दूध खरेदीत ४ रुपयांची वाढ झाली असली तरी, ग्राहकांवर याचा पूर्ण बोजा टाकण्यात आलेला नाही. संस्था पातळीवर १ रुपया आणि वितरकांच्या कमिशनमधील १ रुपया, असा एकूण २ रुपयांचा तोटा संघाने स्वतः सहन केला आहे. त्यामुळे ४ रुपयांऐवजी ग्राहकांना केवळ २ रुपयांची वाढ सोसावी लागणार आहे.
advertisement
१ मार्चपासून काय असतील नवे दर?
सध्याच्या किमतीमध्ये २ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना पाऊच (पिशवी) दुधासाठी आता जादा पैसे मोजावे लागतील. गायीच्या दुधासोबतच म्हशीच्या दुधाच्या दरातही ही वाढ लागू होणार आहे. केवळ दूधच नाही, तर आगामी काळात दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढण्याची चिन्हे आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 7:11 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Milk Price Hike : पुणेकरांच्या खिशाला कात्री! कात्रज दुधाच्या दरात वाढ; 1 मार्चपासून नवे दर लागू






