Pune Weather: पुणेकरांना 'थर्टी फर्स्ट'ही स्वेटर घालूनच साजरं करावं लागणार? नवीन वर्षाच्या सुरुवातीला कसं असेल हवामान?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली स्थिरावला आहे
पुणे :पुणे शहर आणि राज्याच्या विविध भागांत सध्या जाणवणारा कडाक्याचा गारवा पुढील काही दिवस कायम राहणार आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. उत्तरेकडून येणारे शीतलहरींचे वारे आणि आकाश निरभ्र असल्याने वातावरणात कोरडेपणा वाढला आहे. यामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली स्थिरावला आहे. २१ डिसेंबर रोजी हवेली येथे ६.६ अंश सेल्सिअस या यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी देखील शहरात ९.८ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेल्याने पुणेकर हुडहुडी भरवणारा गारवा अनुभवत आहेत.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या अखेरपर्यंत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये रात्रीचे तापमान स्थिर राहील. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढेल. हवामान विभागाच्या गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, २०१८ मध्ये डिसेंबरमधील नीचांकी तापमान ५.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर गेल्या वर्षी ते ८.७ अंशांपर्यंत खाली आले होते. यंदाही थंडीचा हा आल्हाददायी प्रभाव दीर्घकाळ टिकून राहण्याचे संकेत मिळत असून, दिवसाच्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा आढावा घेतला असता, गेल्या दोन दिवसांत तिथे थोडी वाढ झाली असली तरी थंडीचा प्रभाव ओसरलेला नाही. गुरुवारी राज्यामध्ये अहिल्यानगर येथे ८.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ यांसारख्या शहरांतही पारा १० ते १२ अंशांच्या दरम्यान आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. एकंदरीत, जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळतील आणि त्यानंतर कडाक्याची थंडी पुनरागमन करेल, असे चित्र स्पष्ट होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Weather: पुणेकरांना 'थर्टी फर्स्ट'ही स्वेटर घालूनच साजरं करावं लागणार? नवीन वर्षाच्या सुरुवातीला कसं असेल हवामान?









