पुण्यात रात्री अचानक येऊ लागले मोठमोठे स्फोटाचे आवाज; लोक पुरते घाबरले, मांजरीत नेमकं काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, कचऱ्यात असलेल्या काही वस्तूंचे एकापाठोपाठ एक स्फोट होऊ लागले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.
पुणे : पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील घुले वस्ती भागात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास भीतीचे वातावरण पसरले होते. मोंटामार्टच्या मागील बाजूस असलेल्या कालव्यालगत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, कचऱ्यात असलेल्या काही वस्तूंचे एकापाठोपाठ एक स्फोट होऊ लागले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.
महावितरणच्या यंत्रणेला मोठा धोका
धुराचे लोट आणि स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात एकच पळापळ झाली. ही आग वेगाने पसरत थेट महावितरणच्या रोहित्राच्या दिशेने सरकत होती. या आगीत लघुदाब वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून समर्पण प्रतिष्ठानचे आदित्य राखपसरे आणि प्रवीण रणदिवे यांनी तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
advertisement
अग्निशमन दलाची धाव
स्थानिक उद्योजक चंद्रहार घुले यांनी सुरुवातीला अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग नियंत्रणाबाहेर जात होती. अखेर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रशासकीय दुर्लक्षामुळे संताप
मांजरी परिसरात कालव्यालगत बेकायदा कचरा आणि राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भीषण आगीने कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल रहिवासी विचारत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 7:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात रात्री अचानक येऊ लागले मोठमोठे स्फोटाचे आवाज; लोक पुरते घाबरले, मांजरीत नेमकं काय घडलं?








