आता 'ती' भरणार PMC चा खजिना, मिळकत करांच्या वसुलीसाठी दामिनी पथक!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: पुण्यात मिळकत कर वसुलीसाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 7 विशेष दामिनी पथके कर वसुली करणार आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : करवसुली अधिक प्रभावी करण्यासाठी पुणे महापालिकेने महिलांची 7 विशेष दामिनी पथके स्थापन केली आहेत. सुरुवातीच्या प्रयत्नातच दीड कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आले आहे. प्रत्येक पथकात पाच महिला अधिकारी कार्यरत आहेत. शहरभर थकबाकीदारांची मालमत्ता तपासून आवश्यक वसुली कारवाई केली जात आहे. ही योजना प्रथमच राबवण्यात येत आहे. या विषयीची अधिक महापालिका कर आकारणी सहायक आयुक्त अस्मिता तांबे यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
2024 - 25 या वर्षासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाचे उद्दिष्ट 2800 कोटी रुपये आहे. आता पर्यंत 2200 कोटी रुपये वसुली करण्यात आली आहे. उर्वरित 600 कोटींच्या वसुलीसाठी आता दामिनी पथक काम करणार आहे. वसुली पथकामध्ये काम करताना मिळकत धारक महिला असतील तर वसुली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिला वसुली पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
advertisement
7 पथकांमार्फत वसुली
आता 7 पथके असून एक पथक प्रमुख आणि 5 महिला यांचा समावेश आहे. तर त्यांच्या मार्फत जवळजवळ दीड कोटी रुपये वसुली करण्यात आली आहे. दामिनी पथक हे सकाळी मुख्य कार्यालयात येऊन त्यांना कुठल्या भागात जायचं हे सांगितलं जातं. तसेच कर आकारणी विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांची टीम तयार करण्यात आली आहे. या सर्व महिला या विभागात काम करत असल्यामुळे त्यांना सर्व नियम अटी माहिती आहेत.
advertisement
महसुलात वाढ
वसुली पथकाच्या मोहिमेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महिलांच्या सहभागामुळे करवसुली अधिक प्रभावी होत असून महापालिकेच्या महसुलात वाढ होण्यास हातभार लागत आहे. थकबाकीदारांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ते मालमत्ता कर वेळेवर भरण्यास प्राधान्य देत आहेत. अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. महिलांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम अधिक प्रभावी ठरत असल्याचे महापालिका कर आकारणी सहायक आयुक्त अस्मिता तांबे यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 22, 2025 11:20 PM IST