Pune New IT Park : हिंजवडीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर सुटणार! पुण्यात या ठिकाणी होणार नवं आयटी पार्क
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune New IT Park : पुरंदरमध्ये आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार विजय शिवतारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता.
Pune New IT Park in Purandar : पुण्याजवळील पुरंदर तालुक्यात आयटी पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हिंजवडी येथील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या आयटी कंपन्यांसाठी हा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिला जात आहे. यासाठी पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी आणि कोडीत या तीन गावांमध्ये महसूल विभागाच्या मालकीची सुमारे दीड हजार एकर सरकारी जमीन प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गायरान जमिनीवर कंपन्या उभा करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाला देण्यात आला आहे.
हिंजवडीची वाहतूक कोंडी
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील हिंजवडी हे आयटी हब म्हणून विकसित झाले आहे. मात्र, तेथील वाढलेली वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनली आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आयटी कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचायला उशीर होतो, ज्यामुळे अनेक कंपन्यांनी पुण्याबाहेर जाण्याचा विचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती आणि स्वतः हिंजवडी परिसराची पाहणी केली होती.
advertisement
शिंदेंचा प्रकल्पाला पाठिंबा जाहीर
पुरंदरमध्ये आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार विजय शिवतारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. त्यावेळी पुरंदरमध्ये विमानतळ, राष्ट्रीय बाजार आणि रिंग रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांसोबत आयटी पार्क उभारण्याची मागणी करण्यात आली होती. शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिवतारे यांनी विमानतळ प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केला होता.
advertisement
विजय शिवतारे म्हणतात...
दिवे, चांबळी आणि कोडीत या ठिकाणच्या गायरान जमिनीवर आयटी पार्क उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या तीन ठिकाणच्या जमिनी उद्योग विभागाला हस्तांतर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
सुधारित प्रस्ताव सादर
advertisement
या प्रस्तावामध्ये सुरुवातीला काही तांत्रिक त्रुटी होत्या, ज्या उद्योग विभागाने निदर्शनास आणल्या होत्या. विशेषतः, पुरंदरमध्ये प्रस्तावित असलेल्या रिंग रोड, विमानतळ आणि लॉजिस्टिक पार्कमुळे पुन्हा वाहतूक कोंडी होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नांवर विचार करून, मूळ प्रस्तावात बदल करण्यात आला आणि दिवे सोबतच चांबळी आणि कोडीत येथील जागेचा समावेश करून, तीन टप्प्यांत आयटी पार्क उभारण्याचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
advertisement
जिल्हाधिकारी प्रशासन आणि उद्योग विभाग
दरम्यान, या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास, पुणे जिल्ह्यातील आयटी क्षेत्राचा विस्तार होईल आणि हिंजवडीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच, पुरंदर तालुक्यात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. या प्रस्तावावर आता जिल्हाधिकारी प्रशासन आणि उद्योग विभाग काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 08, 2025 3:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune New IT Park : हिंजवडीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर सुटणार! पुण्यात या ठिकाणी होणार नवं आयटी पार्क