Pune Crime: 'नादाला लागाल तर खून करू..'; पुणेकरांना धमकी देणाऱ्या 'दादां'ची पोलिसांनी काढली हवा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
"आम्ही मकोका (MCOCA) मधून बाहेर आलो आहोत, इथले दादा आहोत," असे ओरडत त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण केली.
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात 'आम्ही इथले दादा आहोत' असं म्हणत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी दणका दिला आहे. "आमच्या नादाला लागाल तर खून करू," अशी धमकी देत परिसरात हैदोस घालणाऱ्या दोन मुख्य आरोपींना कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
गेल्या महिन्यात २६ डिसेंबर रोजी कोंढवा परिसरात एका टोळक्याने उच्छाद मांडला होता. सोहेल नवाज शेख उर्फ पठाण (वय २५) आणि सादिक शेख हे त्यांच्या १० ते १२ साथीदारांसह दुचाकीवरून परिसरात आले. या टोळक्याने हातांत तीक्ष्ण शस्त्रे नाचवत नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "आम्ही मकोका (MCOCA) मधून बाहेर आलो आहोत, इथले दादा आहोत," असे ओरडत त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण केली.
advertisement
या टोळक्याने केवळ धमकावूनच थांबले नाही, तर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांत तक्रार करू नये यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सूरज शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध कोंढवा पोलीस घेत होते. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल पठाण आणि सादिक शेख या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांचे इतर १० ते १२ साथीदार अजूनही पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे की, अशा प्रकारे दहशत माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 1:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'नादाला लागाल तर खून करू..'; पुणेकरांना धमकी देणाऱ्या 'दादां'ची पोलिसांनी काढली हवा









