रात्री अकराची वेळ, पिशवीत काहीतरी घेऊन फिरत होता पुण्यातील तरुण; उघडताच पोलिसांकडून अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अक्षय रामभाऊ माने याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता आत असं काही आढळलं की पोलिसही चक्रावले
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम तीव्र झाली आहे. नुकतंच भोसरी परिसरातून एका तरुणाला गांजासह रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. इंद्रायणीनगर भागातील एका नाल्याजवळ अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात भोसरी पोलिसांना यश आलं आहे.
नेमकी कारवाई काय?
सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंद्रायणीनगर येथे सापळा रचला होता. यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अक्षय रामभाऊ माने (वय २५, रा. सद्गुरूनगर, भोसरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता, पोलिसांना मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आला. पोलीस अंमलदार महादेव गुलाब गारोळे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तरुणाकडील गांजाची पिशवीही जप्त करण्यात आली आहे.
advertisement
फ्लॅट बनला 'ड्रग फॅक्टरी'
काही दिवसांपूर्वीच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात हिंजवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये AI आणि हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गांजाची शेती केली जात असल्याचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवणारे तरुण MBA पदवीधर असून त्यांनी आपल्या फ्लॅटलाच एका अत्याधुनिक 'ड्रग फॅक्टरी'चे स्वरूप दिले होते. यात दोघांनी गांजा पिकवण्यासाठी मातीऐवजी पाण्याचा वापर करणारे 'हायड्रोपोनिक' तंत्रज्ञान निवडले होते. फ्लॅटमधील तापमान, आर्द्रता आणि रोपांची वाढ नियंत्रित करण्यासाठी त्यांनी AI आधारित उपकरणांचा वापर केला होता. अत्यंत उच्च दर्जाचा मानला जाणारा ‘OG-Kush’ गांजा ते या लॅबमध्ये पिकवत होते. या रॅकेटचे कामकाज पूर्णपणे डिजिटल आणि हाय-टेक होते. गांजाच्या उत्पादनासाठी लागणारे बियाणे आणि इतर साहित्य हे 'डार्क वेब' आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मागवले जात असे. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी हे आरोपी व्यवहारासाठी 'क्रिप्टोकरन्सी'चा वापर करत होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 8:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रात्री अकराची वेळ, पिशवीत काहीतरी घेऊन फिरत होता पुण्यातील तरुण; उघडताच पोलिसांकडून अटक










