पुण्यातील नामांकित शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थ्यांच्या हातावर लिहिला 'असा' शब्द, ढसाढसा रडली मुलं, पालक संतापले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्याच्या धनकवडीतील एका नामांकित शाळेतून अजब प्रकार समोर आला आहे. यात चिमुकल्यांच्या हातावर चक्क पेनाने 'नेल कट' असे लिहून त्यांना मैदानावर पळण्याची शिक्षा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे: पुण्याच्या धनकवडीतील एका नामांकित शाळेतून अजब प्रकार समोर आला आहे. यात चिमुकल्यांच्या हातावर चक्क पेनाने 'नेल कट' असे लिहून त्यांना मैदानावर पळण्याची शिक्षा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'अनंत निर्मल ग्लोबल स्कूल' मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी सकाळी शाळा भरल्यानंतर क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीची तपासणी केली. ज्या विद्यार्थ्यांची नखे वाढलेली होती किंवा ज्यांनी केस कापले नव्हते, अशा लहान मुलांच्या हातावर शिक्षकांनी मोठ्या अक्षरात 'नेल कट' असे पेनाने लिहिले. इतकेच नाही, तर या मुलांना भर उन्हात मैदानाचे चार फेरे मारण्याची कठोर शिक्षाही दिली.
दिवसभर हात लपवून वावरली मुले
हातावर लिहिलेल्या त्या शब्दांमुळे ही लहान मुले प्रचंड अस्वस्थ झाली होती. आपला हात कोणी पाहू नये, या भीतीने मुलांनी दिवसभर हात लपवून ठेवले. शाळा सुटल्यानंतर जेव्हा पालकांनी आपल्या मुलांना रडवेल्या चेहऱ्याने पाहिले आणि त्यांच्या हातावरील ते शब्द वाचले, तेव्हा हा संतापजनक प्रकार समोर आला. "आम्हाला या शाळेत पाठवू नका," अशी विनवणी करत मुले पालकांसमोर ढसाढसा रडली.
advertisement
पालकांचा रोष आणि शाळेची भूमिका
या शाळेत पहिली-दुसरीसाठी ३० ते ४० हजार रुपये शुल्क आकारले जाते. "शाळेत डायरी आणि व्हॉट्सअॅप ग्रुप असतानाही मुलांच्या हातावर अशा प्रकारे लिहिणे हे त्यांच्या मानसिक आरोग्याशी खेळण्यासारखे आहे," असे मत पालकांनी व्यक्त केले आहे. पालकांनी मुख्याध्यापिका मनीषा धावडे यांच्याकडे धाव घेतली, मात्र केवळ तोंडी सूचना देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील शालेय शिस्तीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या अघोरी शिक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 10:15 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील नामांकित शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थ्यांच्या हातावर लिहिला 'असा' शब्द, ढसाढसा रडली मुलं, पालक संतापले









