Pune Traffic Update: पुणेकरानो लक्ष द्या! उद्या शहरातील वाहतुकीत मोठे बदल; 'हे' रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी अनेक प्रमुख रस्ते बंद ठेवले असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग खुले केले आहेत.
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (१९ फेब्रुवारी) पुणे शहरात विविध मिरवणुका आणि भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी अनेक प्रमुख रस्ते बंद ठेवले असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग खुले केले आहेत.
प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी
मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर म्हणजेच लक्ष्मी रोड, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता आणि पंडित नेहरू रस्त्यावर आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागात जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नागरिकांनी या परिसरात वाहने आणू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
असे असतील वाहतुकीचे पर्यायी मार्ग:
शिवाजी महाराज रस्ता: जिजामाता चौकातून शिवाजी महाराज रस्त्याने जाणाऱ्यांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता - खंडोजीबाबा चौक आणि टिळक रस्त्याचा वापर करावा.
advertisement
गणेश रस्ता: दारूवाला पुलाकडून फडके हौद चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातूनच वळविण्यात येईल.
बाजीराव रस्ता: पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता - अलका टॉकीज आणि फर्ग्युसन रस्त्याने पुढे जावे.
अप्पा बळवंत चौक: केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक मिरवणूक संपेपर्यंत वळविली जाईल. मिरवणूक सुरू असताना वाहनचालकांनी केळकर रस्त्याने सरळ पुढे जाणे अपेक्षित आहे.
advertisement
लक्ष्मी रस्ता: मिरवणूक सोन्या मारुती चौकात असेपर्यंत संत कबीर चौकातून वाहने वळविली जातील.
बालगंधर्व परिसर: मिरवणूक गाडगीळ पुतळा चौकाच्या पुढे जाईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरून बालगंधर्व रंगमंदिराच्या दिशेने सोडली जातील.
आपत्कालीन सेवांना प्राधान्य
वाहतुकीत बदल केले असले तरी रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. मिरवणुकीमुळे मध्यवर्ती भागात गर्दी होण्याची शक्यता असल्याने पुणेकरांनी प्रवासाचे नियोजन वेळेत करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 8:26 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic Update: पुणेकरानो लक्ष द्या! उद्या शहरातील वाहतुकीत मोठे बदल; 'हे' रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?







