मार्केटमध्ये न मिळणाऱ्या गाड्यांवरच 'वॉच'! पुण्यात चोरांचा नवा फंडा, अट्टल चोरांच्या आवळल्या मुसक्या
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दुचाकींपैकी अनेक गाड्या यामाहा कंपनीच्या असून बाजारात सध्या उपलब्ध नसलेल्या मॉडेल्सवरच आरोपींचे लक्ष्य असल्याचे तपासात उघड झाले आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : नशा आणि मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 10 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी अनेक गाड्या यामाहा कंपनीच्या असून बाजारात सध्या उपलब्ध नसलेल्या मॉडेल्सवरच आरोपींचे लक्ष्य असल्याचे तपासात उघड झाले आहे.
advertisement
पवन तानाजी माने (वय 22) आणि प्रतिक शिवाजी अस्वरे (वय 20 ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी हडपसर, दिघी आणि चंदननगर पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी दोन साथीदारांचा सहभाग असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
advertisement
यामाहा कंपनीच्या दुचाकींवर विशेष लक्ष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्यांचे साथीदार पुणे शहरातील हडपसर व चंदननगर परिसरात टेहळणी करून यामाहा कंपनीच्या दुचाकींवर विशेष लक्ष ठेवत होते. बाजारात या कंपनीच्या काही लोकप्रिय मॉडेल्स सहज उपलब्ध नसल्याने, अशा गाड्यांना अधिक मागणी असल्याचा फायदा घेऊन आरोपी त्या चोरी करत होते. चोरी केलेल्या दुचाकींपैकी काही गाड्या ते स्वतः नशा करण्यासाठी, मौजमजेसाठी फिरण्यासाठी तसेच इतर गुन्हे करण्यासाठी वापरत असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.
advertisement
10 दुचाकी लपवून ठेवल्याची कबुली
गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत आरोपींनी चोरीच्या 10 दुचाकी लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या सर्व गाड्या जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत लाखोंच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
कारवाईमुळे चोरांचे धाबे दणाणले
या कारवाईमुळे पुणे शहरातील वाहनचोरीच्या घटनांवर मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 9:51 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मार्केटमध्ये न मिळणाऱ्या गाड्यांवरच 'वॉच'! पुण्यात चोरांचा नवा फंडा, अट्टल चोरांच्या आवळल्या मुसक्या








