पुणेकरांनो, तयार राहा! मोठं संकट येतंय; 'या' दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद? जलसंपदा विभाग आक्रमक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आता पालिकेच्या खात्यात केवळ ०.३६ टीएमसी पाणी शिल्लक असून, हे पाणी जेमतेम १२ ते १५ दिवसच पुरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. हा साठा संपल्यानंतर खडकवासला धरणातून थेंबभरही पाणी उचलता येणार नाही, असे जलसंपदा विभागाने ठणकावून सांगितले आहे.
पुणे: ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पुणेकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाची तब्बल ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. ही रक्कम १५ दिवसांत न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याचा कठोर इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
पाण्याचा 'कोटा' संपला, आता पुढे काय?
पुणे शहरासाठी वर्षाकाठी ११.६० टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, महापालिकेने ३१ जानेवारीपर्यंतच ११.२३ टीएमसी पाणी फस्त केले आहे. आता पालिकेच्या खात्यात केवळ ०.३६ टीएमसी पाणी शिल्लक असून, हे पाणी जेमतेम १२ ते १५ दिवसच पुरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. हा साठा संपल्यानंतर खडकवासला धरणातून थेंबभरही पाणी उचलता येणार नाही, असे जलसंपदा विभागाने ठणकावून सांगितले आहे.
advertisement
९३२ कोटींच्या थकबाकीचा 'शॉक'
महापालिकेकडे २०१६ पासूनची पाणीपट्टी आणि दंडाची रक्कम मिळून ९०० कोटींहून अधिक थकबाकी साचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पालिकेने गेल्या वर्षी मंजूर मर्यादेपेक्षा ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरले आहे. नियमानुसार, मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरल्यास 'तीनपट दंड' आकारला जातो, ज्यामुळे थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे.
पुणेकरांचे डोळे पालिकेकडे
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच उद्भवलेल्या या पेचप्रसंगामुळे सामान्य नागरिक धास्तावले आहेत. पालिका प्रशासन ही प्रचंड थकबाकी कशी भरणार आणि पुणेकरांची तहान कशी भागवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर १५ दिवसांत तोडगा निघाला नाही, तर पुणे शहरात अभूतपूर्व पाणीबाणी निर्माण होऊ शकते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 10:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, तयार राहा! मोठं संकट येतंय; 'या' दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद? जलसंपदा विभाग आक्रमक








