झोपडपट्टीतील चिमुकल्यांच्या हाती आली पाटी-पेन्सिल, पुण्यातील 'ही' संस्था करतेय मोठं काम, Video
- Published by:
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
भारताला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली आहेत. मात्र, आज देखील देशाच्या काही भागांतील अनेक मुलं अजूनही शाळेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेली नाहीत.
पुणे: 'शिक्षण' हे असं माध्यम आहे ज्यामुळे आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहते येते. मात्र, आजही अनेक मुलं या शिक्षणापासून वंचित आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली आहेत. मात्र, आज देखील देशाच्या काही भागांतील अनेक मुलं अजूनही शाळेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. अशा मुलांमध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीतील आणि स्थलांतरित मजुरांच्या मुलांचा समावेश होतो. विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये देखील शाळाबाह्य मुलांची संख्या भरपूर आहे. अशा मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये एक सेवाभावी संख्या कार्य करत आहे.
पुण्यातील 'सदाबहार सोशल फाउंडेशन' या संस्थेने आतापर्यंत झोपडपट्टीतील अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं आहे. समाजातील वंचित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा आणि अशा मुलांच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
सुभाष रामचंद्र पाटील यांनी 2017मध्ये या संस्थेची स्थापना केली. सुभाष हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ले या गावचे रहिवासी आहेत. 1982 साली नोकरीनिमित्त ते पुण्यात आले. फोर्स मोटर्स या कंपनीमध्ये नोकरी करत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी मनाशी बाळगली होती. त्यांच्या या जिद्दीतूनच सदाबहार सोशल फाउंडेशनची स्थापना झाली.
advertisement
विविध घटकांसाठी उपक्रम
या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. झोपडपट्टी व बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी पूर्व-प्राथमिक शाळा चालवली जाते. कामगारांना व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी 'सदा आनंदी राहण्यासाठी दिंडी' नावाचा उपक्रम घेतला जातो. महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. यामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. याशिवाय संस्थेमार्फत वृक्षारोपण, कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, मुलांसाठी काउन्सलिंग व मोटिवेशन हे उपक्रम सातत्याने राबवले जातात.
advertisement
"समाजात बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे," असं सुभाष पाटील म्हणतात. त्यांनी आपल्या याच विचारांना कृतीची जोड देत सदाबहार सोशल फाउंडेशन सुरू केलं आहे. शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा आणि इतर सामाजिक क्षेत्रांमध्ये हे फाउंडेशन सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवत आहे. ज्या नागरिकांना संस्थेच्या कामामध्ये योगदान देण्याची इच्छा आहे, ते www. sadabahar foundation.com. या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून किंवा 9850042831 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 31, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
झोपडपट्टीतील चिमुकल्यांच्या हाती आली पाटी-पेन्सिल, पुण्यातील 'ही' संस्था करतेय मोठं काम, Video

