आम्हाला वकिल व्हायचंय! वयाच्या 75 व्या वर्षी पुणेकरांचा LLB ला प्रवेश, वर्गात निवृत्त कलेक्टर, बँक अधिकारी आणि...
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
वय हा फक्त आकडा हे वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण या वाक्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. तो यंदाच्या विधी पदवी प्रवेश प्रक्रियेतून.
पुणे: वय हा फक्त आकडा हे वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण या वाक्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. तो यंदाच्या विधी पदवी प्रवेश प्रक्रियेतून. राज्य सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार, तीन वर्षांच्या कायदा पदवी अभ्यासक्रमात वयाची साठ ओलांडलेल्या तब्बल 175 ज्येष्ठ उमेदवारांनी यंदा प्रवेश निश्चित केला आहे. 23 हजार उपलब्ध जागांपैकी हा आकडा लक्षणीय मानला जात असून त्यात 70 वर्षांच्या पुढे ही उमेदवाराचाही समावेश आहे. म्हणजेच आयुष्यातील शेवटच्या टप्प्यातही शिक्षणाची ओढ कायम असल्याचे हे चित्र सांगते.
एकीकडे 21 ते 22 वर्षे वयोगट हा या अभ्यासक्रमाचा मुख्य आधार राहिला असला तरी, ज्येष्ठ उमेदवारांची यंदाची संख्या अधिक वाढलेली दिसते. मागील पाच- सहा वर्षांपासून निवृत्तीनंतर ‘कायदा शिकायचा’ असा एक कल समाजात दिसू लागला होता. मात्र तो आता स्पष्टपणे स्थिरावलेला आणि वाढता ट्रेंड बनत चालला आहे. या बदलांमागे विविध सामाजिक आणि वैयक्तिक कारण दिसतात. देशात सातत्याने नव्या कायद्यांची अंमलबजावणी, न्यायव्यवस्थेतील बदल, तसेच रोजच्या जीवनात कायद्याचे वाढते महत्त्व यामुळे ‘लॉ’ हा केवळ तरुणांचा विषय राहिलेला नाही.
advertisement
कायदा शिकणे हे आजकाल एक प्रॅक्टिकल स्किल म्हणूनही पाहिले जात आहे. तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कायदा हा तुमचा साथीदार असतो. त्यामुळे तो समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीता आढाव यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते, कौटुंबिक प्रश्न हाताळण्यासाठी, स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्यासाठी किंवा समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने अनेक ज्येष्ठ व्यक्ती पुन्हा शिक्षणाकडे वळत आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, लोकांना कायद्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करायचे.
advertisement
शिवाय, आयुष्यभर राहून गेलेली इच्छा पूर्ण करायची ही कारणे सर्वाधिक आढळत आहेत. डॉ. आढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त डेप्युटी कलेक्टर, वरिष्ठ सरकारी अधिकारी, शिक्षक, बँक अधिकारी, तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे लोक निवृत्ती नंतर बहुतेक वेळा लॉकडे वळताना दिसत आहेत. अनेकांना समाजातील लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक वाटते. कौटुंबिक वाद, मालमत्ता, वारसा, महिला हक्क, वरिष्ठ नागरिकांचे हक्क यांसारख्या मुद्द्यांवर प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे ते पुढे शिक्षणाचा मार्ग निवडत आहेत.
advertisement
ग्रामीण भागातून विधि पदवीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विशेषत्वाने वाढली आहे. त्यात महिलांचे प्रमाण उल्लेखनीय असून अनेक गृहिणी आणि मुली उच्च शिक्षणासह लॉची निवड करत आहेत. हा बदल ग्रामीण भागातील साक्षरता वाढ, कायदा-जाणिवेत वाढ आणि सामाजिक बदलांचे द्योतक मानला जात आहे. ज्येष्ठ उमेदवारांची वाढती संख्या समाजासाठी सकारात्मक संकेत मानली जाते. वय कितीही असो, नवीन काही शिकायचे धाडस असल्यास आयुष्याची दिशा बदलू शकते. लॉसारखा अभ्यासक्रम निवडणारे ज्येष्ठ उमेदवार तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 24, 2025 7:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आम्हाला वकिल व्हायचंय! वयाच्या 75 व्या वर्षी पुणेकरांचा LLB ला प्रवेश, वर्गात निवृत्त कलेक्टर, बँक अधिकारी आणि...

