Ashadhi Wari 2025: पंढरीचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्तासेच का? तुम्हाला माहितीये का हे कारण?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Ashadhi Wari 2025: दरवर्षी पंढरीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. पंढरीतून जाताना ते प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्तासे आणि फुटाणे घेऊन जातात.
सोलापूर - आषाढी वारीत लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला येतात. विठुरायांच्या नगरीत वारकरी, भाविक चुरमुरे, बत्तासे आणि फुटाणे हा प्रसाद म्हणून आवर्जून खरेदी करतात आणि घरी नेतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. परंतु, प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्तासे आणि फुटाणे हेच भाविक का खरेदी करतात? या संदर्भांत अधिक माहिती सोलापुरातील सुधाकर इंगळे महाराज यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
आषाढी वारीत लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला येतात. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन घरी जात असताना भाविक चुरमुऱ्यांचा प्रसाद घेऊन जात असतात. घरी घेऊन गेलेला प्रसाद शेजारच्या चार घरी आणि नातेवाईकांना देण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. पंढरीत येणारे भाविक हे गोरगरीब शेतकरी आणि इतर कामे करणाऱ्या कुटुंबातील असतात. त्यामुळे चुरमुरे, बत्ताशे आणि फुटाण्यांचा प्रसाद गरिबातील गरीब भाविक देखील खरेदी करू शकतात. चुरमुरे हे सहज उपलब्ध होतात. वजनाने हलके असतात आणि टिकाऊ देखील असतात. तसेच किमतीने देखील स्वस्त असतात, असं इंगळे महाराज सांगतात.
advertisement
चुरमुरे, बत्तासे आणि पेढा हा प्रसाद म्हणून भाविक केवळ पंढरीतूनच घेऊन जात नाहीत. तर तुळजाभवानी मंदिर असेल, शनी शिंगणापूर असेल, कोल्हापूर असेल किंवा कुठलेही तीर्थक्षेत्र असू द्या, तेथून भाविक दर्शन घेतल्यावर प्रसाद म्हणून चुरमुरे आणि बत्तासे खरेदी करून घरी घेऊन जाण्याची पद्धत आहे. पंढरपूरला येणारे वारकरी आणि भाविक महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात तसेच प्रत्येक कानाकोपऱ्यातून, वाडी वस्तीवरून येतात. त्या सर्वांसाठी हा प्रसाद सोयीचा, स्वस्त आणि टिकाऊ पर्याय असल्याचे इंगळे महाराज सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 25, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: पंढरीचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्तासेच का? तुम्हाला माहितीये का हे कारण?