भक्तांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून सुरू होणार चार धाम यात्रा, कधी आणि कशी करावी नोंदणी? आत्ताच वाचा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
चार धाम यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि कठीण तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. या यात्रेत उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात स्थित चार प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ.
Char Dham Yatra 2026 Date : चार धाम यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि कठीण तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. या यात्रेत उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात स्थित चार प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी भारत आणि परदेशातून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. मोक्षप्राप्ती, पापांपासून मुक्ती आणि अध्यात्मिक शांती हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला जाणून घेऊ 2026 मध्ये कधी पासून सुरू होणार चार धाम यात्रा.
कधीपासून सुरू होणार चार धाम यात्रा
यंदाची चार धाम यात्रा 19 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. 19 एप्रिल 2026 रोजी यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिराचे दरवाजे उघडले जातील. त्यानंतर 22 एप्रिल 2026 रोजी 8:00 वाजता केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. आणि यानंतर सर्वात शेवटी म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले केले जातील.
advertisement
यमुनोत्री धाम
चार धाम यात्रेची सुरुवात यमुनोत्री धाम येथून सुरू होते. सनातन धर्मग्रंथांमध्ये याचे वर्णन असित ऋषींचे निवासस्थान असे केले गेले आहे. पवित्र यमुना नदीचा उगम इथूनच होतो. यमुना ही सूर्यची कन्या आणि यमराजाची बहीण मानली जाते. यमुनोत्रीमधे सूर्यकुंड आणि दिव्य खडकांसोबतच यमुनेचे पूजाही केली जाते. येथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो असं मानले जाते.
advertisement
गंगोत्री धाम
गंगोत्री धाम हे गंगा नदीचे उगमस्थान आहे. तिचा उगम गंगोत्री हिमनदीतून होतो. असे मानले जाते की, गंगा गौरी कुंड येथे भगवान शिवाची प्रदक्षिणा करते. दरवर्षी गंगोत्री धामचे दरवाजे उघडताना सहस्रनाम आणि गंगालहरीचे पठण केले जाते. असे म्हटले जाते की, गंगोत्री येथे गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष मिळतो.
advertisement
केदारनाथ धाम
केदारनाथ हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता भाविकांसाठी उघडतील. असे म्हटले जाते की, महाभारत युद्धानंतर पांडवांनी आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी केदारनाथ येथे शिवाची पूजा केली होती. केदारनाथ धाममधील शिवलिंगाचा आकार बैलाच्या पाठीसारखा आहे. ट्रेकिंगच्या मार्गामुळे केदारनाथची यात्रा बरीच आव्हानात्मक मानली जाते. तथापि, भगवान शिवाच्या कृपेने आणि आशीर्वादाने भाविक या धामात पोहोचतात.
advertisement
बद्रीनाथ धाम
बद्रीनाथ हे चार धाम यात्रेचे अंतिम तीर्थक्षेत्र आहे. त्याचे दरवाजे 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6:15 वाजता उघडतील. बद्रीनाथ हे भगवान विष्णूच्या नर-नारायण रूपांचे निवासस्थान आहे. येथील एक प्रसिद्ध आख्यायिका आहे, "जो जाए बद्री, वो न आये ओडरी," ज्याचा अर्थ आहे की जे बद्रीनाथला भेट देतात त्यांना मोक्ष मिळतो. बद्रीनाथमध्ये भगवान विष्णूच्या पूजेसोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.
advertisement
चार धाम यात्रेचे धार्मिक महत्त्व
धार्मिक श्रद्धेनुसार, चार धाम यात्रा पूर्ण केल्याने भक्तांना अनेक लाभ मिळतात. यामुळे पापांचे क्षालन होते, मनःशांती लाभते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. ही तीर्थयात्रा शरीर, मन आणि आत्म्याला शुद्ध करते. हिंदू श्रद्धेनुसार, चार धाम यात्रा आयुष्यात किमान एकदा तरी केली पाहिजे. ही यात्रा मनुष्याच्या भक्ती, श्रद्धा आणि धैर्याची परीक्षाही घेते.
advertisement
नोंदणी कधी आणि कशी करावी?
गर्दीचे नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तराखंड सरकारने 'बायोमॅट्रिक नोंदणी' अनिवार्य केली आहे. तुम्ही उत्तराखंड पर्यटनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता. तसेच 'Tourist Care Uttarakhand' या मोबाईल ॲपवरूनही नोंदणी शक्य आहे. ऋषिकेश आणि हरिद्वारमधील काही केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीची सोय आहे, परंतु गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे केव्हाही उत्तम. नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि आरोग्याशी संबंधित माहिती देणे आवश्यक आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 4:58 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
भक्तांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून सुरू होणार चार धाम यात्रा, कधी आणि कशी करावी नोंदणी? आत्ताच वाचा










