नवरात्रीची सातवी माळ : अंबाबाई देवीची नारायणी नमोस्तुते रूपात पूजा, पाहा कशी साकारण्यात आली Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची सातव्या दिवशी नारायणी नमोस्तुते या रूपात पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूर, 21 ऑक्टोबर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रौत्सव काळातील रोजच्या पूजा या नेहमीच भाविकांचे औत्सुक्य वाढवणाऱ्या असतात. यातच अंबाबाई देवीची सातव्या दिवशी नारायणी नमोस्तुते या रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
काय आहे महती?
सर्व चराचर सृष्टी श्रीदेवी मातेच्या दिव्य तेजांशातुन निर्माण झाली. यामुळे 'एकैवाहं जगत्यत्र द्वितीया का ममापरा' अर्थात अखिल ब्रह्मांडात मीच एकटी नित्य विद्यमान आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे कोण आहे? असे श्रीदेवीमाता म्हणते. यामुळे शुंभ-निशुंभ युद्धावेळी ब्रह्मादि देवतांची शक्तिस्वरूपे श्रीदेवीमातेच्या साथीस, युद्धात असुरांशी लढण्यासाठी उतरल्या. श्रीदेवी मातेने शुंभ-निशुंभांचा वध केला आणि त्रैलोक्यास दुःख मुक्त केले, असे श्री पुजकांनी सांगितले आहे.
advertisement
असे केले आहे देवीचे स्तवन
श्रीदेवी महात्म्याचा अर्थात सप्तशतीचा अकरावा अध्याय 'नारायणी स्तुती' या नावाने ओळखला जातो. या अध्यायात श्रीदेवीची स्तुती करताना म्हणण्यात आले आहे की, 'त्वयैकया पूरितमम्बयैतत्' अर्थात हे माते हे सर्व विश्व तू एकटीनेच व्यापलेले आहेस. याच अकराव्या अध्यायात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्री, चामुंडा या रूपात असणाऱ्या हे नारायणी तुला नमस्कार असो. असे देवीचे स्तवन केले असल्याची माहितीही श्री पुजकांनी दिली आहे.
advertisement
कशी साकारण्यात आली आहे पूजा?
नारायणी नमोस्तुते या रूपातील अंबाबाई देवीची पूजा सप्तशती महायंत्रासह अतिशय सुंदररित्या साकारण्यात आली आहे. देवी सिंहावर विराजमान असून पाठीमागे ब्राह्मणी देवी, माहेश्वरी देवी, कौमारी देवी, वैष्णवी देवी, वाराही देवी, इंद्राणी देवी, चामुंडा देवी या देवीमातांचे फोटो लावण्यात आले आहेत. दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलेल्या सर्व देवतांची पूजा या महायंत्रामध्ये असते आणि ही देवी या यंत्राची अधिष्ठात्री देवता आहे.
advertisement
तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर? Video
दरम्यान विश्वातील वेगवेगळ्या शक्ती ही एका आदिशक्तीचीच विविध रूपे आहेत, हे दर्शवणारी सप्तमातृकाशक्ति श्रीदेवी मातेची ही करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीची नवरात्रीच्या सप्तमीची महापूजा आहे. ही पूजा अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक आशुतोष ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारलेली आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
October 21, 2023 7:55 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीची सातवी माळ : अंबाबाई देवीची नारायणी नमोस्तुते रूपात पूजा, पाहा कशी साकारण्यात आली Video