Ram Mandir: रामलल्लाची मूर्ती घडवण्यासाठी काळा पाषाण वापरण्याचं कारण काय?
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Ram Mandir : ही मूर्ती पुढील हजारो वर्षांहून अधिक काळ टिकेल. भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यासाठी रामलल्लाची मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी ऋषींची जीवनशैली स्वीकारली होती
नवी दिल्ली, 20 जानेवारी : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती आणल्यानंतर या मूर्तीचे फोटो वेगानं व्हायरल होत आहेत. कोट्यवधी भाविक या मूर्तीला वंदन करीत आहेत. रामलल्लाच्या या मूर्तीची 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. पण रामलल्लाची ही मूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या पाषाणाबद्दल म्हणजेच कृष्णशिलेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ही मूर्ती तयार करणारे मूर्तीकार अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता योगीराज यांनी सांगितलं की, 'रामलल्लाची मूर्ती घडवण्यासाठी कृष्णशिलेचा वापर करण्यामागे एक विशेष कारण आहे. कृष्णशिलेमध्ये असे गुण आहेत की जेव्हा तुम्ही अभिषेक करता, म्हणजेच मूर्तीला दूध अर्पण करता तेव्हा तुम्ही त्या दुधाचं सेवन करू शकता. ते दूध प्यायल्यानंतर त्याचा आरोग्यावर कोणताही विपरित परिणाम होत नाही.
'मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या पाषाणामुळे दुधाच्या गुणधर्मात कोणताही बदल होत नाही. त्यामुळेच या पाषाणाची निवड करण्यात आली आहे. तसंच हा पाषाण कोणत्याही प्रकारचं अॅसिड, आग किंवा पाण्यावर रिअॅक्शन देत नाही. ही मूर्ती पुढील हजारो वर्षांहून अधिक काळ टिकेल. भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यासाठी रामलल्लाची मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी ऋषींची जीवनशैली स्वीकारली होती,' असंही विजेता यांनी सांगितलं.
advertisement
मूर्ती घडवताना ऋषींसारखा होता दिनक्रम
विजेता यांनी माहिती दिली की, 'रामलल्लाची मूर्ती तयार करताना संपूर्ण कालावधीत अरुण यांनी 'सात्विक अन्न', फळं आणि अंकुरलेलं धान्य असा आहार घेतला. ते जवळपास सहा महिने एखाद्या ऋषीसारखे जीवन जगले.' अरुण यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापनेसाठी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विजेता म्हणाल्या, 'आम्ही याचा कधी विचारही केला नव्हता. पण अरुण यांच्याकडे खूप प्रतिभा आहे. या निमित्तानं त्यांच्या कलेची जगभरात ओळख आणि कौतुक होत आहे.'
advertisement
अरुण पाचव्या पिढीतील मूर्तीकार
'आमच्या घराण्यातील अरुण हे पाचव्या पिढीतील मूर्तीकार आहेत,' असंही विजेता यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या,'अरुण यांनी वयाच्या 11 व्या वर्षी मूर्तीचं काम सुरू केलं, आणि तेव्हापासून ते आमच्या कुटुंबाच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक बनलेत. देशभरातील लोकांकडून प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद मिळत असून, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आम्ही कुटुंबासह अयोध्येला जाणार आहोत,' असंही विजेता यांनी स्पष्ट केलं.
advertisement
दरम्यान, 500 वर्षानंतर रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार आहेत. 22 जानेवारीला हा सोहळा होणार असून देशभरातील वातावरण राममय झाले आहे.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
January 20, 2024 1:28 PM IST