Mahashivratri: पांढरे शिवलिंग आणि रहस्यमय ध्यानगृह, महाराष्ट्रातील पशुपतीनाथांचं प्रसिद्ध मंदिर माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Mahashivratri: संपूर्ण काळ्या पाषाणात उभारलेल्या पशुपतीनाथ मंदिरातील पिंडीवरील शाळूंखा पांढरी शुभ्र आहे. या मंदिराची तुलना नेपाळ आणि वाराणसी येथील पशुपतीनाथ मंदिराशी केली जाते.
प्रीती निकम,प्रतिनिधी
सांगली: श्री शंभू महादेवाच्या अति प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे सांगलीच्या रेठरेहरणाक्ष येथील पशुपती मंदिर होय. कृष्णा नदीच्या काठी काळ्या पाषाणात उभारलेल्या या मंदिरातील शाळूंखा मात्र पांढरी शुभ्र आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालील भूमिगत ध्यानगृह तसेच भिंतींवरील शरभाच्या शिल्पांनी मंदिराचे ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्व जाणवते. या रहस्यमय मंदिराची तुलना नेपाळ आणि वाराणसी मधील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराशी केली जाते.
advertisement
शेकडो वर्षांपूर्वीच्या या गुढरम्य मंदिराबद्दल वेगवेगळ्या काळातील अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. श्री पशुपती मंदिराच्या सांस्कृतिक वारशाविषयी लोकल18च्या प्रतिनिधींनी रेठरेहरणाक्ष गावचे रहिवासी मोहन जाधव यांच्याकडून त्यांच्या ऐकिवातील माहिती जाणून घेतली.
शंभू महादेवाने काळानुसार अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते. शिव पुराणानुसार भगवान शंकराचे एकूण 19 अवतार झाले आहेत. त्यापैकीच नृसिंहाचा राग शांत करण्यासाठी घेतलेला तो 'शरभावतार' मानला जातो. शरभावतारामध्ये भगवान शंकरांचे शरिर अर्धे हरीण आणि बाकीचे शरभ पक्षी म्हणजे पुराणात वर्णिलेले आठ पायांचे प्राणी जे सिंहापेक्षा बलवान असे होते. हा शरभावतार म्हणजेच श्री पशुपती होय.
advertisement
शरभावताराची कथा
पुराणात शिवाच्या शरभवताराची कथा आहे. त्यानुसार भगवान विष्णूने हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नृसिंहावतार घेतला. हिरण्यकश्यपूला मारूनही जेव्हा नरसिंहाचा राग शांत झाला नाही. तेव्हा देवता शिवाच्या जवळ गेल्या. भगवान शिवांनी शरभावतार घेतला आणि या रूपात ते भगवान नरसिंहापर्यंत पोहोचले आणि त्यांची स्तुती केली. परंतु, नरसिंहाचा राग शांत झाला नाही. हे पाहून शरभ रूपातील भगवान शिवांनी नरसिंहाला आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ते उडून गेले. मग कुठेतरी भगवान नरसिंहाचा राग शांत झाला, असे पुराण कथेतून सांगितले जाते.
advertisement
मंदिराची रचना
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष गावातून कृष्णा नदी दक्षिण वाहिनी आहे. इथेच कृष्णेच्या रम्य काठावर काळ्या दगडांनी बांधलेले श्री पशुपती मंदिर आहे. मंदिराची रचना तीन भागांमध्ये दिसते. प्रथम मंदिराच्या समोरील पटांगणामध्ये पुरातन अशी एक दगडी दीपमाळ आहे. दिपमाळेवर गरुड, मारूती अशी शिल्प आहेत. अलीकडे लोखंडी पत्र्याचे नवे सभागृह बांधले आहे. तसेच लहान पुरातन दगडी सभागृह आणि संपूर्ण दगडी बांधकामातील गर्भगृह आहे. सभामंडपामध्ये एकाच शीळेमध्ये कोरलेला नंदी आहे.
advertisement
गाभाऱ्याच्या दगडी प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला खाली आणि वरती कीर्तीमुख दिसते. दोन्ही बाजूस शस्त्रधारी दोन द्वारपाल आणि दोन हत्तींची शिल्पे आहेत. सभा मंडपामध्ये एका बाजूस श्री गणेशाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूस देवीची मूर्ती आहे.
advertisement
अत्यंत दुर्मिळ पांढरे शिवलिंग
साधारण सर्वच शिव मंदिरांमध्ये काळ्या रंगाचे शिवलिंग पाहायला मिळते. परंतु या पशुपती मंदिरामध्ये महाराष्ट्रातील एकमेव असे शुभ्र पांढरे शिवलिंग पाहायला मिळते. संपूर्ण काळ्या पाषाणात उभारलेल्या या मंदिरातील पिंडीवरील शाळूंखा पांढरी शुभ्र असल्याने मंदिराचे वेगळेपण ठरते.
रहस्यमय ध्यानगृह
श्री पशुनाथ मंदिराच्या गर्भगृहाखाली रहस्य जाणवते. शिवलिंगाच्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे. इथून खाली शिवलिंगाच्या अगदी खालोखाल भूमिगत ध्यानगृह आहे. साधारणपणे चार बाय चारचे हे रहस्यमय ध्यानगृह असून इथून कुठे भुयारी मार्ग असेल की काय याचे भाविकांना गुढ वाटते.
advertisement
स्थापत्यशास्त्राचे नमुने
मंदिर परिसरामध्ये आत्तापर्यंत एकही शिलालेख आढळला नाही. यामुळे मंदिराची ठोस अशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. तरीही मंदिराच्या स्थापत्य रचनेवरून काही अंदाज वर्तवले जातात. श्री पशुपती मंदिराच्या बाहेरील बाजूस दगडी भिंतींवरती शरभशिल्पे आहेत. तसेच गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नक्षीकामामध्ये दोन्ही बाजूस ऋषीमुनींचे शिल्प आहे. या शिल्पामध्ये ऋषीमुनींनी दोन्ही बाजूस केस सांभार केला आहे. केशरचनेच्या या प्रकारावरून ते पराशर ऋषींचे शिल्प असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
कृष्णेचा डोह
रेठरेहरणाक्ष येथील कृष्णेचा डोह रमणीय आहे. कृष्णा नदीच्या रम्य काठावर वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि भक्तांसाठी एक खास आकर्षण आहे. विशेष म्हणजे इथून वाहणारी कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी आहे. रेठरेहरणाक्ष आणि बिचुद गावाच्या शेत जमिनीमध्ये शांत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पशुपती मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अधिक खुलते.
भाविकांचे श्रद्धास्थान
रेठरेहरणाक्ष आणि पंचक्रोशीतील भक्तांसह मंदिरा विषयी माहिती असलेले कित्येक शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. रेठरे हरणाक्ष गावचे ग्रामस्थ श्री पशुपती मंदिरामध्ये पारायण सोहळा साजरा करतात. महाशिवरात्री दिवशी पारायण सप्ताहाची सांगता करून यात्रा करतात.
श्री पशुपती तीर्थक्षेत्री जाण्याचा मार्ग
पशुपती क्षेत्री जाण्यासाठी सांगली एसटी स्थानकावरून एसटी सेवा आहे. श्री पशुपतीचे मंदिर कृष्णकाठी शेतामध्ये असल्याने थेट मंदिरापर्यंत एसटी बस जात नाही. वैयक्तिक किंवा खाजगी वाहनाने जावे लागते. तासगाव-कराड या बसने पशुपती फाट्यापर्यंत जाता येते. तासगाव-कराड या मार्गावर ताकारच्या पुढे डाव्या बाजूस श्री पशुपती हे क्षेत्र आहे. तर कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गावर ताकारी रेल्वे स्थानक आहे. या स्टेशनला उतरून बस किंवा खाजगी रिक्षेने 9 किमी अंतरावर असलेल्या श्री पशुपती या तीर्थक्षेत्री जाता येते. तर सांगलीपासून रेठरेहरणाक्ष हे 50 किलोमीटर अंतरावर आहे. श्री सागरेश्वर मंदिरापासून हे ठिकाण साधारणपणे 12 किलोमीटर आहे.
श्री पशुपतिनाथ मंदिर पांडव काळामध्ये एका रात्रीत बांधल्याची आख्यायिका सांगतात. तर काही लोक या या मंदिराचा संबंध नाथसंप्रदायाशी असल्याचे देखील सांगतात. मंदिर परिसरापासून काही अंतरावर श्री नरसिंहाचे मंदिर, श्रीरामाचे मंदिर यासह मच्छिंद्रगड आणि नाथ संप्रदायातील काही स्थळे असल्याने अनेक अंदाज वर्तवले जातात. परंतु नेमक्या आणि ठोस पुराव्यांअभावी पशुपती मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रकाशात येऊ शकले नाही.
स्थापत्य संशोधकांनी श्री पशुपती मंदिराला भेट देऊन स्थापत्य शैलीच्या अभ्यासातून ठोस पुरावे आणि नवी माहिती शोधण्याची अपेक्षा पशुपतीचे भाविक व्यक्त करतात. जगभरामध्ये असलेल्या पशुपतीच्या दुर्मिळ मंदिरांपैकी हे मंदिर असल्याने मंदिराचे सांस्कृतिक महत्त्व प्रकाशात येणे आवश्यक वाटते.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
February 26, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Mahashivratri: पांढरे शिवलिंग आणि रहस्यमय ध्यानगृह, महाराष्ट्रातील पशुपतीनाथांचं प्रसिद्ध मंदिर माहितीये का?