Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिरात उमांगमलज जन्मोत्सव, बाप्पाला 1100 नारळांचा महानैवद्य, काय आहे परंपरा?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिरात दरवर्षी उमांगमलज जन्मोत्सवाचे मोठ्या भक्तिभावाने आयोजन केले जाते. यंदा या सोहळ्याला भाविकांनी अपार प्रतिसाद दिला.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने कार्तिक शुद्ध चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी श्री गणरायाला 1100 नारळांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. गाणपत्य संप्रदायानुसार कार्तिक शुद्ध चतुर्थी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशांचा उमांगमलज हा अवतार झाला, अशी श्रद्धा असून या दिवशी मोरयाला नारळ समर्पित करण्याची परंपरा विशेष मानली जाते.
या पार्श्वभूमीवर दगडूशेठ गणपती मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात आकर्षक नारळ आरास आणि सुंदर फुलांनी सजावट करण्यात आली होती. पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त पठणाने सोहळ्याची सुरुवात झाली. पहाटे 4 ते सकाळी 6 दरम्यान सुप्रसिद्ध गायिका शेफाली कुलकर्णी-साकुरीकर यांच्या स्वराभिषेक कार्यक्रमाने भक्तांचे मन भारावून टाकले. सकाळी 8 वाजता गणेश याग पार पडला, त्यानंतर नारळांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. संपूर्ण वातावरण मंत्रोच्चारांनी आणि भक्तिगीतांनी दुमदुमून गेले होते.
advertisement
या प्रसंगी उपस्थितांना उमांगमलज अवताराच्या उत्पत्तीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला आणि त्याला जिवंत केले. त्याचे आणि भगवान शंकरांचे युद्ध झाल्यानंतर भगवान विष्णूंनी त्या बालकाच्या धडावर गजमस्तक बसविले आणि त्याला गजानन नाव मिळाले. ही कथा सर्वश्रुत असली तरी या अवताराचे दैवी तत्त्व उमांगमलज या नावाने ओळखले जाते.
advertisement
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, उमा म्हणजे पार्वती आणि ‘अंगमलज’ म्हणजे तिच्या अंगावरील मळापासून जन्मलेला असा या शब्दाचा अर्थ आहे. मात्र हा शब्दशः अर्थ न घेता या कथेमागील आध्यात्मिक अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पार्वती म्हणजे आपली बुद्धी, आणि तिच्यावर चढलेला अहंकार व ममत्व हाच मळ आहे. जेव्हा तो मळ दूर होतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात प्रकट होणारे शुद्ध, शांत आणि प्रसन्न स्वरूप म्हणजेच श्री उमांगमलज होय.
advertisement
उमांगमलज अवताराचा गाभा हा आत्मशुद्धी आणि अहंकार निर्मूलन यामध्ये आहे. मंदिर परिसरात या दिवशी विशेष भक्तिभावाने आरती, भजन, कीर्तन आणि प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची गर्दी होत असते. या दिवशी व्रत पाळून गणेश उपासना करतात.
दगडूशेठ मंदिरात दरवर्षी या उत्सवाचे मोठ्या भक्तिभावाने आयोजन केले जाते. या वर्षीच्या सोहळ्याला भाविकांनी अपार प्रतिसाद दिला. धार्मिक विधी, मंत्रोच्चार, गायन आणि प्रसाद या सर्वांमुळे वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली. श्रींच्या चरणी 1100 नारळांचा महानैवेद्य अर्पण करताना भक्तांनी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 25, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिरात उमांगमलज जन्मोत्सव, बाप्पाला 1100 नारळांचा महानैवद्य, काय आहे परंपरा?

