श्रावणात शंकराच्या मंदिरात अभिषेक बंद, महाराष्ट्रातल्या 5 पैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरानं घेतला मोठा निर्णय
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ghruneshwar Mandir: श्रावण महिन्यात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे वेरूळचे श्री घृष्णेश्वर मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. परंतु, या काळात अभिषेक बंद राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्यात देशभरातील शिवमंदिरांत भाविकांची मोठी मांदियाळी असते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री घृष्णेश्वर मंदिर आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. यंदा श्रावण सुरू झाला असून याच पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता फक्त दर्शन घेता येणार असून गर्दीमुळे अभिषेक बंद राहणार आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावणात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. हीच बाब लक्षात घेऊन दर्शनाच्या रांगा कमी करण्यासाठी आणि भक्तांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी संपूर्ण महिनाभर घृष्णेश्वराचा अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. श्रावण महिन्यात मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे, असं देखील ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
अभिषेक बंद असला तरी दर्शनासाठी आलेल्या भक्तांना गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगावर पांढरी फुले, बेलाची पाने (बेलफूल) आणि धोतऱ्याची फुले वाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भाविकांच्या भावनांचा आदर राखून गर्दीचे नियोजन करणे शक्य होणार आहे. हा निर्णय केवळ श्रावण महिन्यातील गर्दीच्या कालावधीसाठी असून, महिन्यानंतर परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे श्रावणात घृष्णेश्वराचे दर्शन अधिक सुलभ आणि जलद होईल.
advertisement
सर्व भाविकांनी या निर्णयाच्या आदर करावा आणि सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील मंदिर ट्रस्टकडून करण्यात आलंय. तसेच अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय हा केवळ श्रावण महिन्यापुरता मर्यादित असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jul 25, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
श्रावणात शंकराच्या मंदिरात अभिषेक बंद, महाराष्ट्रातल्या 5 पैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरानं घेतला मोठा निर्णय







