डोकं कापल्यानंतर 18 महिने जिवंत राहिला कोंबडा, यामागचं कारण ऐकून नक्कीच बसेल धक्का
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका शेतकऱ्याने आपल्या फार्महाऊसवर एका कोंबड्याची मान कापली आणि त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला.
मुंबई : आपण अनेकदा म्हणतो की एखाद्या प्राण्याचे किंवा सजीवाचे प्राण त्याच्या कंठात असतात. त्यामुळे एकदा का त्याची मान कापली की तो सजीव जास्त काळ जिवंत राहूच शकत नाही. निसर्गाचे नियमच तसे आहेत. पण विज्ञानाच्या इतिहासात एक अशी घटना घडली आहे, जी ऐकून आजही डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ थक्क होतात.
चिकनच्या शॉपवर गेलात तर तुम्ही पाहिलं असेल की तो शॉपवाला आधी कोंबडीची मान कापतो आणि मग नंतर काही सेकंदात तडफडून ती कोंबडी मरते. पण एका शेतकऱ्याने आपल्या फार्महाऊसवर एका कोंबड्याची मान कापली आणि त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला. कारण तो कोंबडा मेला नाही. उलट, तो पुढचे 18 महिने म्हणजेच तब्बल दीड वर्ष न डोकं धरता धावत होता, फिरत होता आणि चक्क 'जेवत' ही होता. ही कोणती जादुई कथा नाही, तर 10 सप्टेंबर 1945 रोजी घडलेली एक सत्य घटना आहे. चला तर मग, 'माईक' नावाच्या या जगप्रसिद्ध बिनडोक्याच्या कोंबड्याचा थक्क करणारी घटना जाणून घेऊ
advertisement
ही गोष्ट आहे अमेरिकेतील कोलोराडो येथील फ्रूटा शहरातील. लॉयड ऑलसेन आणि त्यांची पत्नी क्लारा आपल्या शेतात नेहमीप्रमाणे कोंबडी कापत होते. लॉयड यांनी एका कोंबड्यावर कुऱ्हाडीने वार केला. कोंबड्याचं डोकं बाजूला पडलं, पण तो कोंबडा तिथेच शांत बसून राहण्याऐवजी ताडकन उठला आणि धावू लागला. लॉयड यांना वाटलं काही क्षणात तो मरेल आणि शांत बसेल, पण तसं झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी डबा उघडून पाहिलं, तेव्हा तो बिनडोक्याचा कोंबडा अजूनही जिवंत होता.
advertisement
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वैज्ञानिकांनी यावर शोध सुरू केला. तज्ज्ञांच्या मते, या चमत्कारामागे दोन मुख्य वैज्ञानिक कारणं होती
1. ब्रेन स्टेम (Brain Stem) सुरक्षित राहणे: कोंबड्याचा मेंदू हा मानवी मेंदूप्रमाणे समोर नसून डोक्याच्या मागील भागात असतो. कुऱ्हाडीचा वार अशा कोनातून बसला की, माईकचा चेहरा, चोंच आणि डोळे तर गेले, पण त्याच्या मेंदूचा मुख्य भाग (Brain Stem) सुरक्षित राहिला. हाच भाग श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके आणि पचन नियंत्रित करतो.
advertisement
2. रक्ताची गुठळी (Blood Clot): सहसा मान कापल्यावर रक्तस्त्राव होऊन मृत्यू होतो. पण माईकच्या बाबतीत नशीब जोरावर होतं. मान कापल्याबरोबर तिथे रक्ताची गुठळी जमली, ज्यामुळे रक्त वाहणं थांबलं आणि तो जिवंत राहिला.
लॉयड ऑलसेन यांनी या 'चमत्कारी' कोंबड्याला मारण्याऐवजी त्याला जगवण्याचा निर्णय घेतला. ते एका ड्रॉपर किंवा सिरिंजच्या मदतीने माईकच्या अन्ननलिकेत थेट दूध, पाणी आणि मक्याचे पातळ मिश्रण टाकायचे. त्याच्या श्वासनलिकेत साचलेला कफही ते सिरिंजने साफ करायचे. याच विशेष काळजीमुळे माईक 18 महिने म्हणजेच दीड वर्ष जगला.
advertisement
त्याकाळी माईक इतका प्रसिद्ध झाला होता की लोक त्याला पाहण्यासाठी पैसे मोजायचे. त्याला 'माईक द हेडलेस चिकन' (Mike the Headless Chicken) या नावाने ओळखले जाऊ लागले. दुर्दैवाने, मार्च 1948 मध्ये श्वास गुदमरल्यामुळे माईकचा मृत्यू झाला.
निसर्ग कितीही अजब असला तरी विज्ञानाचे नियम कधीच चुकत नाहीत. माईकची ही घटना म्हणजे केवळ योगायोग आणि विज्ञानाचा एक दुर्मिळ खेळ होता. आजही फ्रूटा शहरात दरवर्षी 'माईक'च्या स्मरणार्थ सण साजरा केला जातो.
advertisement
माईकची गोष्ट आपल्याला हेच सांगते की, निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. एखादा जीव जगण्याची जिद्द धरतो, तेव्हा मृत्यूही काही काळ लांबणीवर पडू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 10:29 PM IST
मराठी बातम्या/science/
डोकं कापल्यानंतर 18 महिने जिवंत राहिला कोंबडा, यामागचं कारण ऐकून नक्कीच बसेल धक्का










