20,00,00,00,00,00,000 पृथ्वी जिंकणारी 'सुपर-पॉवर' गँग; धक्कादायक शोध, विज्ञानाला चक्रावून सोडलं

Last Updated:

Ants On Earth: पृथ्वीवर तब्बल 20 क्वाड्रिलियन मुंग्या कशा टिकून राहिल्या आणि संपूर्ण जगावर कसं वर्चस्व गाजवू शकल्या, याचं आश्चर्यकारक उत्तर नव्या वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं आहे. ‘ताकद’ नव्हे तर ‘संख्याबळ’ हीच मुंग्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

News18
News18
तुम्हाला माहीत आहे का की आपल्या पृथ्वीवर सुमारे 20 क्वाड्रिलियन (20,00,00,00,00,00,000) मुंग्या राहतात. ही संख्या शून्यांमध्ये लिहिली तर कोणालाही थरकाप उडावा अशी आहे. इतक्या छोट्या, नाजूक आणि कमजोर दिसणाऱ्या मुंग्यांनी अख्ख्या जगावर वर्चस्व कसे प्रस्थापित केले, हा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
आता मेरीलँड विद्यापीठ आणि कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या नव्या संशोधनाने याचं उत्तर शोधून काढलं आहे. हे उत्तर जितकं भयावह आहे, तितकंच ते अद्भुतही आहे. मुंग्यांनी उत्क्रांतीच्या शर्यतीत ‘गुणवत्ते’पेक्षासंख्याबळा’ला प्राधान्य दिलं. अधिकाधिक अपत्ये जन्माला घालता यावीत म्हणून त्यांनी स्वतःच्या शरीरावरील संरक्षण कवच जाणीवपूर्वक कमकुवत केलं. सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासातून निसर्गाने कसं ‘कमजोराला ताकदवान’ बनवलं, हे उघड झालं आहे. हे संशोधन मानवी समाज आणि लष्करी रणनीतींकडे पाहण्याची दृष्टीही बदलून टाकणारं आहे.
advertisement
सोशल मीडियावर आणि मित्रांमध्ये एक मजेशीर पण विचार करायला लावणारा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तुम्ही घोड्याएवढ्या आकाराच्या एका बदकाशी लढाल का, की बदकाएवढ्या आकाराच्या शंभर घोड्यांशी? हा प्रश्न ऐकायला जरी विनोदी वाटत असला, तरी जीवशास्त्रात तो अत्यंत गंभीर आहे. हा प्रश्न म्हणजे ‘क्वालिटी विरुद्ध क्वांटिटी’ या संघर्षाचं प्रतीक आहे. एक ताकदवान जीव श्रेष्ठ ठरतो का, की अनेक कमकुवत जीव एकत्र येऊन जिंकतात? नव्या अभ्यासानुसार, उत्क्रांतीच्या पातळीवर ही कोंडी कशी सुटते, याचं उत्तर मुंग्यांनी शोधून काढलं आहे आणि ते उत्तर म्हणजे संख्याबळ. मोठं, मजबूत शरीर तयार करण्याऐवजी त्यांनी लहान पण अफाट संख्येची फौज उभी केली. म्हणूनच आज मुंग्या सर्वत्र दिसतात. तुमच्या स्वयंपाकघरातसुद्धा आणि अमेझॉनच्या दाट जंगलातही.
advertisement
या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही मुंग्यांच्या प्रजातींनी आपल्या वसाहती मोठ्या करण्यासाठी प्रत्येक मुंगीच्या ‘गुणवत्तेशी’ तडजोड केली. मुंग्यांच्या शरीरावर एक कठीण आवरण असतं, ज्याला ‘क्युटिकल’ म्हणतात. हाच त्यांचा बाह्य कंकाल असतो, जो त्यांना जखमा, आजार आणि शत्रूं पासून वाचवतो. मात्र हे कवच तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. संशोधकांना आढळून आलं की ज्या मुंग्यांनी आपलं क्युटिकल पातळ आणि कमजोर ठेवलं, त्या जास्त संख्येने कामकरी मुंग्या निर्माण करू शकल्या. कारण कवचावर खर्च होणारी ऊर्जा त्यांनी नव्या मुंग्या तयार करण्यासाठी वापरली. परिणामी, जरी त्या मुंग्या वैयक्तिक पातळीवर कमकुवत असल्या, तरी समूहाच्या स्वरूपात त्या अजेय ठरल्या आणि उत्क्रांतीच्या शर्यतीत सर्वांत पुढे गेल्या.
advertisement
article_image_1
या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक इवान इकोनोमो, जे मेरीलँड विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत, सांगतात की जीवशास्त्रात हा एक मूलभूत प्रश्न आहे. जसा समाज अधिक गुंतागुंतीचा होतो, तसा व्यक्तीचा दर्जा काय होतो? त्यांच्या मते, समाज जितका मोठा आणि संघटित होतो, तितकी व्यक्ती अधिक साधी बनते. कारण जे काम एक जीव एकट्याने करायचा, ते काम आता संपूर्ण समूह मिळून करतो. यामुळे व्यक्ती ‘स्वस्त’ बनतेतिला तयार करणं सोपं होतं, मोठ्या संख्येने निर्माण करता येतं, मात्र ती वैयक्तिक पातळीवर कमी मजबूत असते. सामाजिक कीटकांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही संकल्पना प्रथमच तपासण्यात आली आहे.
advertisement
या सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी मुंग्या सर्वात योग्य ठरल्या, कारण त्यांच्या वसाहतींमध्ये कधी दहा, तर कधी लाखो मुंग्या असतात. या अभ्यासाचे प्रमुख लेखक आर्थर मॅट, कॅम्ब्रिज विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे पीएचडी विद्यार्थी आहेत. त्यांनी सांगितलं की मुंग्या सर्वत्र आढळतात, पण त्यांच्या या विलक्षण यशामागचं गमक आजवर स्पष्ट नव्हतं. संशोधकांनी असा अंदाज बांधला की वसाहतीचा आकार आणि शरीरावरील संरक्षण कवच यांच्यात काहीतरी तडजोड असावी. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी तब्बल ५०० हून अधिक मुंग्यांच्या प्रजातींचेD एक्स-रे स्कॅन केले. यात क्युटिकल आणि शरीराच्या एकूण आकाराचे अचूक मोजमाप करण्यात आले.
advertisement
article_image_1
या अभ्यासाचे निष्कर्ष अत्यंत रंजक होते. मुंग्यांच्या शरीरात क्युटिकलचा वाटा ६ टक्क्यांपासून ३५ टक्क्यांपर्यंत आढळून आला. जेव्हा हा डेटा उत्क्रांतीच्या गणिती मॉडेल्समध्ये टाकण्यात आला, तेव्हा स्पष्ट झालं की ज्या मुंग्यांचं क्युटिकल पातळ होतं, त्यांच्या वसाहती प्रचंड मोठ्या होत्या.
क्युटिकल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आणि खनिजांची गरज असते. निसर्गात नायट्रोजन सहज उपलब्ध नसतो. त्यामुळे जर मुंगी जाड कवच तयार करेल, तर तिला अधिक अन्नाची गरज भासेल आणि वसाहतीची संख्या मर्यादित राहील. मुंग्यांनी हुशारीने हा खेळ ओळखला. त्यांनी कवच पातळ केलं, नायट्रोजन वाचवलं आणि त्याच बचतीतून हजारो-लाखो नवीन मुंग्या निर्माण केल्या. संशोधकांच्या मते, त्यांनी ‘स्वतःवर गुंतवणूक’ करण्याऐवजी ‘वाटून घेतलेली कामगार फौज’ उभी केली.
article_image_1
इवान इकोनोमो यांनी या संकल्पनेला गंमतीने ‘इव्होल्यूशन ऑफ स्क्विशेबिलिटी’ असं नाव दिलं आहे. म्हणजेच ‘चिरडले जाण्याची क्षमता विकसित होणे’. ऐकायला हे विचित्र वाटतं. कोणता जीव मुद्दाम स्वतःला कमजोर बनवेल? पण समूहाच्या दृष्टीने हा सौदा फायद्याचा ठरतो. जेव्हा लाखो मुंग्या एकत्र काम करतात, तेव्हा एका मुंगीचं आयुष्य तुलनेने कमी मोलाचं ठरतं. पातळ कवचामुळे त्यांना मोठ्या समूहांमध्ये राहण्याचं स्वातंत्र्य मिळालं. संशोधकांच्या मते, हे कमजोर कवच सामूहिक अन्नशोध आणि घरट्याच्या संरक्षणासारख्या सामाजिक गुणधर्मांचा भाग आहे.
या अभ्यासात आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला. ज्या मुंग्यांमध्ये क्युटिकलवरील गुंतवणूक कमी होती, त्या प्रजाती वेगाने नवीन प्रजातींमध्ये रूपांतरित झाल्या. याला जीवशास्त्रात डायव्हर्सिफिकेशन रेट म्हणतात. कमी नायट्रोजनची गरज असल्यामुळे या मुंग्या अन्नटंचाई असलेल्या कठीण प्रदेशातही तग धरू शकल्या. त्यामुळे त्या नव्या वातावरणांवरही ताबा मिळवू शकल्या.
या संशोधनाचा मानवी समाज आणि युद्धनीतीशीही खोल संबंध आहे. पूर्वीच्या युद्धांत जड कवचधारी शूरवीर असायचे, ते वैयक्तिकदृष्ट्या अत्यंत ताकदवान होते. पण काळ बदलला. त्यांच्या जागी धनुर्धारी आणि क्रॉसबो चालवणारे सैनिक आले. ते एकटे कमजोर होते, पण संख्येने प्रचंड. त्यांनी युद्धाचं पारडं बदललं. याच संदर्भात लँचेस्टरचे नियम लागू होतात. जे सांगतात की कधी संख्याबळ ताकदीवर मात करतं. हेच नियम मुंग्यांवरही लागू होतात.
article_image_1
शेवटी, मुंग्यांची ही रणनीती आपल्याला ‘सामूहिक बुद्धिमत्ता’ (Collective Intelligence) याबद्दल महत्त्वाचा धडा देते. जशा आपल्या शरीरातील पेशी एकट्या काहीच नाहीत, पण एकत्र येऊन एक जटिल मानव बनवतात, तसंच मुंग्यांचं आहे. त्या एकट्या साध्या असतात, पण एकत्र आल्यावर सुपर-ऑर्गॅनिझम बनतात. मुंग्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की जग जिंकण्यासाठी बाहुबली असणं गरजेचं नाही, फक्त तुमची टीम मोठी असली, तरी पुरेसं आहे.
view comments
मराठी बातम्या/science/
20,00,00,00,00,00,000 पृथ्वी जिंकणारी 'सुपर-पॉवर' गँग; धक्कादायक शोध, विज्ञानाला चक्रावून सोडलं
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement