Maharashtra Kesari : उलटफेर करणाऱ्या बाळू बोडकेला धक्का, निकाल फिरला, सिकंदर-शिवराजचं काय झालं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे निकाल आले आहेत. सिकंदर, पृथ्वीराज, शिवराज आणि हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र केसरीच्या तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली आहे.
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे निकाल आले आहेत. सिकंदर, पृथ्वीराज, शिवराज आणि हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र केसरीच्या तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. वाघोली येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कुस्तीचे सामने पार पडले, यात सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये मजल मारली आहे.
गादी विभागाचे निकाल
रामकृष्ण सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेत गतविजेत्या पाचही महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी आजचा दिवस गाजवला आणि विजय मिळवला. गादी विभागाच्या दुसऱ्या फेरीमध्ये पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने धाराशिवच्या धीरज बारस्करला 12-2 ने धूळ चारली.
नांदेडच्या शिवराज राक्षेने पुण्याच्या श्रेयस होळकरचा 10-0 ने पराभव केला. तर कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने सांगलीच्या सत्पाल शिंदेला 10-0 ने पराभूत केलं. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने अमरावतीच्या वेताळ शेळकेला 8-1 ने पराभूत केलं.
advertisement
उलटफेर करणाऱ्या बोडकेला धक्का
माती विभागामध्ये हिंगोलीच्या सिकंदर शेखने पुण्याच्या मनिष रायतेला 8-2 ने धूळ चारली, तर गडचिरोलीच्या विक्रमसिंग भोसलेने नाशिकच्या बाळू बोडकेचा 4-1 ने पराभव केला. बाळू बोडकेने गुरूवारी महाराष्ट्र केसरीमध्ये मोठा उलटफेर केला होता. बाळूने प्रसिद्ध मल्ल ज्ञानेश्वर जमदाडे याला लोळवलं होतं, त्यामुळे बाळूकडून पुढच्या राऊंडमध्ये मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती.
advertisement
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये माती आणि गादी विभागाचे हे सामने एकतर्फीच झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे निदान पुढच्या राऊंडमध्ये तरी कुस्तीचे थरारक सामने पाहायला मिळतील, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 10:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : उलटफेर करणाऱ्या बाळू बोडकेला धक्का, निकाल फिरला, सिकंदर-शिवराजचं काय झालं?









