इस्लाम स्वीकार कर, क्रिकेटपटूवर धर्म बदलण्यासाठीची जबरदस्ती, माजी गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
- Written by:Prashant Gomane
Last Updated:
Danish Kaneria: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी वॉशिंग्टनमध्ये काँग्रेसनल ब्रीफिंगदरम्यान धक्कादायक आरोप केला आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू असल्यामुळे त्यांच्यावर सातत्याने भेदभाव झाला आणि त्यामुळेच त्यांचे क्रिकेट करिअर उद्ध्वस्त झाले. शाहीद आफ्रिदी यांनी जबरदस्ती धर्म बदलण्याचा आग्रह केला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट कनेरिया यांनी केला आहे.
नवी दिल्ली: माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या अमेरिकी संसदीय चर्चेत (Congressional briefing) मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा उचलून धरत, त्यांनी दावा केला की त्यांची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द भेदभावामुळे उद्ध्वस्त झाली.
सन्मान आणि समान वागणूक दिली नाही
समाजात असलेल्या अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण या कार्यक्रमात सहभागी झालो असल्याचे कनेरिया यांनी सांगितले. मी पाकिस्तानसाठी खेळलो, पण मला तिथे योग्य तो सन्मान आणि समान वागणूक मिळाली नाही. या भेदभावामुळेच मी आज अमेरिकेत आहे, असे त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
इस्लाम धर्म स्वीकारण्यास वारंवार दबाव टाकला
पाकिस्तानसाठी ६१ कसोटी सामने खेळलेले कनेरिया हे देशाचे फक्त दुसरे हिंदू क्रिकेटपटू आहेत. त्यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, शाहीद आफ्रिदी याने त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी वारंवार दबाव टाकला.
advertisement
मी चांगली कामगिरी करत होतो, काउंटी क्रिकेटही खेळत होतो. इंझमाम-उल-हकने मला खूप पाठिंबा दिला आणि तोच एकमेव कर्णधार होता, ज्याने मला मदत केली. सोबतच शोएब अख्तर देखील चांगल्या नजरेने पाहायचा. पण, शाहीद आफ्रिदी आणि इतर अनेक खेळाडूंनी मला त्रास दिला. त्यांनी माझ्यासोबत जेवणही घेतले नाही. आफ्रिदी तर वारंवार मला धर्म परिवर्तन करण्यास सांगायचा.
advertisement
पाकिस्तानी क्रिकेटमधील धार्मिक भेदभावाचा गंभीर आरोप
कनेरिया यांनी सांगितले की, इंझमाम-उल-हकने कधीही धर्म बदलण्याची भाषा केली नाही, पण आफ्रिदीसह काही खेळाडूंनी मात्र त्यांच्यावर दबाव आणला. त्यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या समस्या जगभर पोहोचवण्यासाठी आणि योग्य कारवाई व्हावी यासाठी ही माहिती अमेरिकेत मांडल्याचे स्पष्ट केले.
क्रिकेट आणि राजकारणात खळबळ
कनेरिया यांच्या या गौप्यस्फोटाने पाकिस्तानमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याआधीही त्यांनी आपल्यावरील भेदभावाबद्दल बोलले होते, मात्र आता अमेरिकेच्या संसदीय चर्चेत यावर आवाज उठवल्याने हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 13, 2025 5:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
इस्लाम स्वीकार कर, क्रिकेटपटूवर धर्म बदलण्यासाठीची जबरदस्ती, माजी गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ