T20 World Cup : वानखेडेच्या 29 हजार प्रेक्षकांसमोर चमत्कार, नेपाळचा वर्ल्ड कपमध्ये थरारक विजय
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेपाळने स्कॉटलंडवर थरारक विजय मिळवला आहे. स्कॉटलंडने दिलेलं 171 रनचं आव्हान नेपाळने 20 व्या ओव्हरमध्ये पार केलं.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेपाळने स्कॉटलंडवर थरारक विजय मिळवला आहे. स्कॉटलंडने दिलेलं 171 रनचं आव्हान नेपाळने 20 व्या ओव्हरमध्ये पार केलं. दीपेंद्र सिंग ऐरे नेपाळच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. दीपेंद्र सिंगने 23 बॉलमध्ये 237.39 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 50 रन केले, यात 3 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. याशिवाय कुशल भुरटेलने 35 बॉल 43 आणि आसिफ शेखने 27 बॉल 33 रनची खेळी केली. गुलशन झा 16 बॉलमध्ये 20 रनवर नाबाद राहिला. स्कॉटलंडकडून मायकल लिस्कने सगळ्या 3 विकेट घेतल्या.
नेपाळ आणि स्कॉटलंडचा हा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल 29 हजार प्रेक्षक आले होते, ज्यातील बहुतेक प्रेक्षक हे नेपाळच्या टीमचे चाहते होते. याआधीही मुंबईमध्ये झालेल्या नेपाळच्या सामन्यात चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. स्कॉटलंड आणि नेपाळच्या टीमचं टी-20 वर्ल्ड कपमधलं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे, पण तरीही चाहत्यांनी या सामन्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला. 19.2 ओव्हरमध्ये नेपाळने स्कॉटलंडच्या आव्हानाचा थरारक पाठलाग केला.
advertisement
या सामन्यात नेपाळने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर स्कॉटलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 170 रन केल्या. ओपनर मायकल जोन्सने 45 बॉलमध्ये 71 रनची खेळी केली, तर जॉर्ज मुन्सीने 27 आणि ब्रॅन्डन मॅकमुलेन याने 25 रन केले. नेपाळकडून सोमपाल कामी याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर नंदन यादवला 2, रोहित पौडेल आणि कुशल भुरटेलला 1-1 विकेट मिळाली.
advertisement
या सामन्यासह नेपाळ आणि स्कॉटलंडचे यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधले सामने संपले आहेत, पण नेपाळने संपूर्ण स्पर्धेत खेळलेल्या क्रिकेटमुळे त्यांचं कौतुक होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नेपाळ विजयाच्या जवळ पोहोचली होती, पण फक्त 4 रननी त्यांचा पराभव झाला. वर्ल्ड कपच्या 4 सामन्यांमध्ये नेपाळने 1 सामना जिंकला तर 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे स्कॉटलंडनेही 4 मॅचमध्ये एक विजय मिळवला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 10:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वानखेडेच्या 29 हजार प्रेक्षकांसमोर चमत्कार, नेपाळचा वर्ल्ड कपमध्ये थरारक विजय









