T20 वर्ल्ड कप नाही, तर पाकिस्तानचा भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार! स्पर्धेत पुन्हा खळबळजनक ट्विस्ट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या विरोधात निषेधाच्या पर्यायांचा विचार करत असल्याचं वृत्त आहे.
मुंबई : बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या विरोधात निषेधाच्या पर्यायांचा विचार करत असल्याचं वृत्त आहे. बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपमधले त्यांचे सामने भारताऐवजी श्रीलंकेमध्ये खेळवले जावेत, अशी विनंती केली होती, पण आयसीसीने बांगलादेशची ही विनंती मान्य केली नाही, त्यामुळे बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला आहे. आयसीसीच्या या निर्णयाचा निषेध म्हणून 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तान बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमधील वृत्तसंस्था असलेल्या जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सगळे पर्याय खुले ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात सहभागी होण्यास नकार देणे, हा एक पर्याय असला तरी दुसरा पर्याय म्हणजे स्पर्धेतून पूर्णपणे माघार घेणे, असा असू शकतो.
पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात खेळायला नकार दिला तर भारताला या सामन्याचे दोन पॉईंट्स दिले जातील. पाकिस्तानने स्पर्धेवर बहिष्कार टाकला तर त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, तसंच त्यांना आयसीसीच्या कारवाईलाही सामोरं जावं लागू शकतं.
advertisement
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर बांगलादेशने आयसीसीला त्यांचे सामने श्रीलंकेमध्ये ठेवण्याची विनंती केली होती. आयसीसीसोबत दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर सर्व देशाच्या बोर्डांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला, ज्यात बांगलादेशच्या बाजूने फक्त 2 आणि विरोधात 14 मतं पडली, त्यामुळे बांगलादेशची विनंती मान्य केली गेली नाही. आयसीसीच्या या निर्णयामुळे बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि आता बांगलादेशऐवजी स्कॉटलंडची टीम टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे.
advertisement
पाकिस्तानचा निषेध का?
बांगलादेशची विनंती मान्य न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच आयसीसीचा निषेध नोंदवला आहे. आयसीसीची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी केला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचं का नाही, याचा निर्णय पंतप्रधानांसोबत सल्लामसलत केल्यानंतर घेतला जाईल, असंही मोहसीन नक्वी यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला होता, जिथे दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे 2027 पर्यंत दोन्ही टीम आयसीसी स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी खेळतील, असा निर्णय घेतला गेला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 5:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कप नाही, तर पाकिस्तानचा भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार! स्पर्धेत पुन्हा खळबळजनक ट्विस्ट








