Thane News : पत्नीने स्पष्ट नकार देताच पतीचा संयम सुटला; घराच्या दारातच केलं भयान कांड
Last Updated:
Thane Shocking News : ठाणे येऊर परिसरात पतीने पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली. पत्नी गंभीर जखमी झाली असून येऊर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे : ठाणे शहरातून कौटुंबिक वादातून झालेल्या हिंसाचाराची गंभीर घटना समोर आली आहे. पतीने पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येऊर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घरगुती वाद विकोपाला
येऊरमधील रोनाचा पाडा येथे राहणाऱ्या सुशीला तानाजी वाघ (वय37) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पती तानाजी बाबू वाघ (वय42) यांना दारूचे व्यसन आहे. या कारणामुळे घरात वारंवार वाद होत होते. अखेर जून 2025 पासून सुशीला वाघ आपल्या दोन मुलांसह वेगळ्या ठिकाणी राहत होत्या.
कपडे धुत असताना मागून आला आणि डोक्यात वार केला
मंगळवारी सायंकाळी तानाजी वाघ जबरदस्तीने पुन्हा एकत्र राहण्याचा आग्रह धरत सुशीला यांच्या घरी आले. मात्र पत्नीने स्पष्ट नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या पतीने सायंकाळी साडेआठच्या सुमारास सुशीला वाघ घराबाहेर कपडे धुत असताना अचानक लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला.
advertisement
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
या हल्ल्यात सुशीला वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. आरडाओरड ऐकून शेजारी राहणाऱ्या शालू स्वामी (वय35) घटनास्थळी धावल्या. त्यांनी तातडीने जखमी सुशीला वाघ यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारानंतर सुशीला वाघ यांनी येऊर पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून आरोपी पतीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 8:22 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : पत्नीने स्पष्ट नकार देताच पतीचा संयम सुटला; घराच्या दारातच केलं भयान कांड









