ठाण्यात भल्या पहाटे थरार, रीलस्टार बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांवरही फायरींग
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि बांधकाम व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.
ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी पहाटे गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि बांधकाम व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. विशेष म्हणजे, आरोपींनी केवळ दहशत माजवली नाही, तर पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.
कारवर आणि हवेत गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी बाबा खान यांच्या घराबाहेर येत एकूण तीन राऊंड फायर केले. यातील एक गोळी तिथे उभ्या असलेल्या गाडीला लागली, तर दोन गोळ्या हवेत झाडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. गोळीबाराच्या आवाजाने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केलं.
advertisement
पोलिसांशी चकमक आणि आरोपीची अटक
मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी तिथेच होते. त्यांना पोलिसांनी घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पोलिसांच्या दिशेनेही दोन गोळ्या झाडल्या. यात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिक काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, त्याचा दुसरा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
advertisement
कोण आहेत बाबा खान?
नदीम मोइनुद्दीन खान उर्फ 'बाबा खान' हे मुंब्रा भागातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स असून स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बाबा खान यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या आणि त्यांनी तशी रीतसर तक्रारही पोलिसांत नोंदवली होती. तरीही हा हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 11:59 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
ठाण्यात भल्या पहाटे थरार, रीलस्टार बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांवरही फायरींग










